• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • US Election 2020: श्रीनिवास कुलकर्णी नावाचा उमेदवारही लढवतोय अमेरिकन निवडणूक; परराष्ट्र सेवेतली नोकरी सोडून उतरले रिंगणात

US Election 2020: श्रीनिवास कुलकर्णी नावाचा उमेदवारही लढवतोय अमेरिकन निवडणूक; परराष्ट्र सेवेतली नोकरी सोडून उतरले रिंगणात

श्रीनिवास कुलकर्णी (Sri Kulkarni) नावाचा उमेदवार अमेरिकन निवडणूक लढवतोय माहीत आहे का? ट्रम्प विरुद्ध बायडन लढत अगदी चुरशीची ठरत असली, तरी अनेक मूळ भारतीय अमेरिकन राजकारणांचं भवितव्यसुद्धा या निवडणुकीवर अवलंबून आहे. त्यापैकीच एक आहेत. डेमोक्रॅटिक पक्षातर्फे रिंगणात असलेले उमेदवार श्रीनिवास

 • Share this:
  टेक्सास, 4 नोव्हेंबर: श्रीनिवास कुलकर्णी उर्फ श्री प्रेस्टन कुलकर्णी (Sri Kulkarni) नावाची व्यक्ती अमेरिकन निवडणुकीच्या (US Election) रिंगणात आहे हे तुम्हाला माहीत आहे का? ट्रम्प (Donal Trump) यांच्या धोरणांमुळे देशाचं नुकसान होत आहे, असं वाटून डिप्लोमॅटिक सेवेचा राजीनामा देत दोन वर्षांपूर्वीच कुलकर्णी राजकारणात सक्रिय झाले. त्यांना डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारीसुद्धा मिळाली. आता ट्रम्पविरोधात दंड थोपटून ते टेक्सासमधून (Texas) निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला कडवी लढत देत आहेत. कुलकर्णी ही निवडणूक जिंकले तर टेक्सासमधून निवडून येणारे ते पहिले हिंदू अमेरिकन ठरतील. अमेरिकेच्या संसद गृहात पोहोचण्यासाठी टेक्सासच्या 22 व्या काँग्रेशनल डिस्ट्रिक्टमधून ते निवडणून लढवत आहेत. उच्चविद्याविभूषित कुलकर्णी यांची आई अमेरिकन तर वडील भारतीय वंशाचे आहेत. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनची पदव्युत्तर पदवी घेऊन श्री कुलकर्णी डिप्लोमॅट म्हणून  परराष्ट्र विभागात नोकरी करत होते.  धोरण ठरवणाऱ्या समित्यांमध्ये ते होते. याशिवाय सिनेटर क्रिस्टन गिलिब्रँड यांचे संरक्षणविषयक सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केलं आणि तिथेच त्यांचा राजकारणाशी संबंध आला. त्यांनी दोन वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की, डोनल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आणि त्यांनी त्यांची धोरणं लादायला सुरुवात केली. ती अयोग्य असल्याचं माहीत असूनसुद्धा नोकरीत असताना त्यांना विरोध करणं शक्य नव्हतं. म्हणूनच नोकरीचा राजीनामा देत ट्रम्प यांच्या धोरणांना विरोध करायचं ठरवलं. विजय सोपा नाही टेक्सास प्रांतात सध्या रिपब्लिकन पक्षाचाच प्रतिनिधी आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराला ही निवडणूक सोपी नाही. निकालाच्या पहिल्या कलानुसार कुलकर्णी पिछाडीवर होते. पण त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी मात्र 45 टक्के आहे. ट्रॉय नेल्स या रिपब्लिकन उमेदवाराशी त्यांचा सामना आहे. श्वेतवर्णीयांची मक्तेदारी अधिक असलेल्या या राज्यात आशियायी लोकही बरेच आहेत. म्हणूनच श्री यांना उमेदवारी मिळू शकली. पण तरीही त्यांचा विजय सहज सोपा नाही. महाराष्ट्रात मूळ श्री कुलकर्णी यांचे वडील वेंकटेश कुलकर्णी हे 70 च्या दशकात अमेरिकेत स्थायिक झाले. कुलकर्णी परिवाराचं मूळ महाराष्ट्र आणि कर्नाटकात आहे असं ते म्हणाले होते. वडील वेंकटेश कुलकर्णी स्वतः लेखक, कादंबरीकार आणि युनिव्हर्सिटीत प्रोफेसर होते. श्रीनिवास यांचा जन्म 1978 ला लुइझाना इथे झाला. पण त्यानंतर कुलकर्णी कुटुंब टेक्सासमधल्या ह्यूस्टनला स्थलांतरित झाले. श्रीनिवास यांची आई मार्गारेट प्रेस्टन  कुलकर्णी या मूळच्या वेस्ट व्हर्जिनिया प्रांतातल्या. त्यांचे वाडवडील मेक्सिकोतून अमेरिकेत आलेले. श्री प्रेस्टन कुलकर्णी यांचं शिक्षण टेक्सास मध्येच झालं. वडिलांचा कर्करोगामुळे आजारी होते तेव्हा कॉलेज सोडून श्री त्यांच्या सेवेसाठी आले होते. पण ल्युकेमियामुळे वडिलांंचं निधन झालं. त्यानंतर श्रीनिवास यांनी शिक्षण पूर्ण केलं. हार्वर्डमधून पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केलं आणि अमेरिकन परराष्ट्र सेवेत दाखल झाले. इस्रायल, इराक, रशिया, तैवान अशा अनेक देशांत त्यांनी परराष्ट्र सेवेत अधिकारी म्हणून काम केलं. श्री प्रेस्टन कुलकर्णी इंग्रजीशिवाय स्पॅनिश, मँडेरिन चायनीज, रशियन आणि हिंदी  भाषा जाणतात.
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published: