वॉशिंग्टन, 5 नोव्हेंबर : अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीचे (US Presidential Election 2020) निकाल अद्यापही स्पष्ट झालेले नाहीत. डोनाल्ड ट्रम्प किंवा जो बायडेन दोघांपैकी कुणालाही स्पष्ट विजय मिळणार नाही, हे त्यामुळे उघड झालंच आहे. अटीतटीचा सामना असलेली 7 राज्य काय निकाल देतात याकडे आता अमेरिकेचं लक्ष आहे. पण इथून निकाल यायला वेळ लागला आणि मतांमधला फरक फारसा नसेल तर मात्र निकाल चांगलाच रखडणार अशी चिन्हं आहेत. ट्रम्प कोर्टात जाण्याचा दावा करत आहेत, तसे ते खरंच गेले, तर कदाचित महिनाभरसुद्धा अमेरिकेचा नवा अध्यक्ष कोण होणार हे ठरू शकणार नाही.
अमेरिकेतले न्यायाधीश सार्वभौम, स्वायत्त नाहीत
अमेरिकेतली न्यायव्यवस्था भारतीय न्यायव्यवस्थेपेक्षा वेगळी आहे. आपल्याकडे न्यायमूर्तींना सार्वभौमत्व आहे. न्यायव्यवस्था स्वायत्त आहे आणि त्याचा राजकीय पक्षांशी काहीही संबंध नाही. पण अमेरिकेत न्यायाधीशांची नेमणूक राजकीय पक्षच करतात. निवडणुकीआधीच ट्रम्प यांनी एका महत्त्वाच्या पदी महिला न्यायाधीशाची नेमणूक करून ठेवलेली आहे. म्हणूनच राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल आपल्याविरोधात जातोय हे लक्षात येताच ट्रम्प कोर्टात जाऊ शकतात. त्यांनी आधीच तसं सूतोवाच केलेलं आहे. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलं, तर निकालाला विलंब होणार हे निश्चित.
अमेरिकेच्या इतिहासात हे पहिल्यांदा झालेलं नाही
अमेरिकेच्या इतिहासात हा विलंब पहिल्यांदा झालेला नाही. अगदी अलीकडच्या निवडणुकांमध्ये 2000 साली जॉर्ड बुश (धाकटे) सत्तेवर येण्यापूर्वी त्यांनाही मोठ्या संख्येने बहुमत मिळालेलं नव्हतं. तेव्हाही निकालाचं प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं होतं. त्या वेळी फ्लोरिडा स्टेटचा कौल महत्त्वाचा ठरला. आता ट्रम्पसुद्धा याच पद्धतीचा विचार करू शकतात. अमेरिकेची राज्य आणि राज्यांतर्गत कायदे खूप बलवान आहेत. त्यामुळे राज्यांच्या कौलावरच अध्यक्षाची निवड तिथे होते.