‘आजारी’ मसूद अझर घेतोय पाक लष्कराच्या रुग्णालयात उपचार

‘आजारी’ मसूद अझर घेतोय पाक लष्कराच्या रुग्णालयात उपचार

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी याच मसूद अझरच्या जैश ए मोहम्मद या संघटनेने घेतली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, २ मार्च : ‘जैश ए मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझर आजारी आहे आणि घराबाहेरही पडू शकत नाही, असं वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी केलं होतं.

पण मसूद अझर पाकिस्तानमध्ये रावळपिंडीत लष्कराच्या रुग्णालयात उपचार घेतोय. याच रावळपिंडीला पाकिस्तानी लष्कराचं मुख्यालय आहे.

मसूद अझरला मूत्रपिंडाचा विकार आहे आणि त्यामुळे त्याला डायलिसिस वर ठेवण्यात आलंय, असं पाकिस्तानमधल्या सुरक्षा अधिकाऱ्यांनीच सांगितलं आहे.

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी याच मसूद अझरच्या जैश ए मोहम्मद या संघटनेने घेतली आहे.

मसूद अझर याआधी ओसामा बिन लादेनचा जवळचा सहकारी होता. त्याने अनेक देशांमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणल्या आहेत. त्यासोबतच त्याने युरोपमधल्या मशिदींमध्येही जिहाद सुरू केला.

कंदहार अपहरण प्रकरणात मसूदची सुटका झाल्यानंतर ओसामा बिन लादेनने त्याच रात्री त्याच्यासाठी पार्टी ठेवली होती. मी आणि मसूद अझरने 1993 मध्ये पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं, असंही लादेनने त्यात सांगितलं होतं.

काश्मीरमध्ये जिहादी कारवाया पसरवल्याच्या आरोपावरून मसूद अझरला १९९४ मध्ये अटक झाली होती. त्यानंतर ओमर शेख या दहशतवाद्याने त्याच्या सुटकेसाठी चार परदेशी पर्यटकांचं अपहरण केलं होतं.

सुरक्षा यंत्रणांनी या पर्यटकांना सोडवलं आणि ओमर शेखला अटक केली. पण पुन्हा १९९५ मध्ये ओमर शेखच्या संघनटेच्या दहशतवाद्यांनी पाच पर्यटकांचं अपहरण करून त्यांना ठार मारलं. हे सगळं मसूद अझरच्या सुटकेसाठीच करण्यात आलं होतं.

कंदहार विमान अपहरण प्रकरणात मसूद अझरची सुटका झाल्यानंतर लगेचच एप्रिल २००० मध्ये श्रीनगरच्या बदामीबाग छावणीत आत्मघातकी हल्ला घडवून आणला होता.

त्याआधी मसूद अझरने झांबिया, अबु धाबी, सौदी अरेबिया, मंगोलिया, यूके आणि अल्बानिया या देशांमध्ये जाऊन त्याने मुस्लीम तरुणांची ‘जिहाद’ साठी भरती करायचा उद्योग सुरू केला. इथून त्याने दहशतवादी कारवायांसाठी निधीही जमवला.

कंदहार विमान अपहरण प्रकरणानंतर मसूद अझरने जैश ए मोहम्मद ही संघटना स्थापन केली आणि त्यानंतर भारतात अनेक घातपाती कारवाया घडवून आणल्या. संसदेवरचा हल्ला तसंच उरी, पठाणकोट आणि पुलवामा या दहशतवादी हल्ल्यांना तोच जबाबदार आहे.

मसूद अझरला अटक करावी म्हणून पाकिस्तानवर वाढता दबाव आहे. पण पाकिस्तानचे मंत्री आणि अधिकारी त्याच्याबद्दल उलटसुलट वक्तव्य करण्यातच मग्न आहेत.

त्याला जागतिक पातळीवरचा दहशतवादी म्हणून जाहीर करावं, अशी मागणी भारताने केली आहे. पण चीनसारख्या देशांचा त्याला विरोध असल्यामुळे तेही शक्य झालेलं नाही.

==================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2019 06:46 PM IST

ताज्या बातम्या