लंडन, 17 जानेवारी : शस्त्रास्त्रांची दलाली करणाऱ्या संजय भंडारी याचं भारताकडे प्रत्यार्पण करण्याचे आदेश ब्रिटनच्या गृहसचिव सुएला ब्रेव्हरमन यांनी दिले आहेत. १२ जानेवारी रोजी ब्रेव्हरमन यांनी भंडारी यांच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले होते. संजय भंडारी हे प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप भाजपकडून केला जातो. रॉबर्ट वाड्रा यांच्या लंडनमधील घराचे सुशोभिकरण संजय भंडारीने केल्याचा आरोप करण्यात आला होता. आता ब्रिटनच्या गृहसचिवांनी दिलेल्या आदेशाविरोधात आता अपील करण्यासाठी भंडारी यांना १५ दिवसांची मुदत मिळणार आहे.
वेस्ट मिनिस्टर न्यायालयात संजय भंडारीने ईडी आणि इनकम टॅक्सच्या प्रत्यार्पणासाठीच्या अपीलाविरोधात आव्हान दिलं होतं. न्यायालयाने संजय भंडारीची याचिका फेटाळून लावत ईडी, आयकर विभागाच्या बाजूने निकाल दिला होता. आता उच्च न्यायालयात २६ जानेवारीच्या आधी अपील करण्याचा एकमेव पर्याय संजय भंडारीसमोर आहे. पण ट्रायल कोर्टाच्या निकालात दोष नसल्यास उच्च न्यायालया असे अर्ज स्वीकारत नाही.
हेही वाचा : 26/11 हल्याचा मास्टरमाईंड अब्दुल मक्की अखेर दहशतवादी म्हणून घोषित, भारताला मोठे यश
भारतासह परदेशात संजय भंडारीच्या अनेक कंपन्या असून भारताबाहेर मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवलं. मात्र भारतीय कर अधिकाऱ्यांकडे याबाबतची माहिती न देता मालमत्ता जमवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. युके, दुबई इथे मालमत्ता असून युएई, पनामामध्ये कंपन्या आणि परदेशी बँकात असणाऱ्या ठेवी यांचा संजय भंडारीच्या मालमत्तेमध्ये समावेश आहे. कर चोरी करताना त्याने मालमत्तेची मालकी जाहीर न करता खोटी कागदपत्रे तयार केल्याचाही आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.
मनी लाँडरिंगचा त्याचा प्रयत्न होता. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या संस्थांच्या नेटवर्कमध्ये खोटे व्यवहार दाखवण्यात आले. भारताच्याच नाही तर इतर देशांच्या मनी लाँड्रिंगविरोधी कायद्यापासून वाचण्याच्या उद्देशाने खरी ओळख लपवणे आणि उत्पन्नाच्या स्रोताची माहिती त्याने दिली नाही. संजय भंडारीला लंडनमध्ये १५ जुलै २०२० रोजी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने सशर्त जामीनही दिला गेला होता. १ जुलै २०१५ ते ७ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत कर चोरी केल्याचा आरोप संजय भंडारीवर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress