टॅक्सी धावणार ब्रिटनमध्ये, कर भरणार नेदरलँडला ; ब्रिटनमध्ये उबरवर बंदी

उबर या कंपनीला लंडनमध्ये मोठा धक्का बसलाय. लंडनच्या वाहतूक नियमन संस्थेनं उबरचा परवानाच रद्द केलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 23, 2017 06:09 PM IST

टॅक्सी धावणार ब्रिटनमध्ये, कर भरणार नेदरलँडला ; ब्रिटनमध्ये उबरवर बंदी

23 सप्टेंबर : उबर या कंपनीला लंडनमध्ये मोठा धक्का बसलाय. लंडनच्या वाहतूक नियमन संस्थेनं उबरचा परवानाच रद्द केलाय. यामागची कारणं आणि त्याचे परिणाम काय होतील, जाणून घेऊयात...

उबरला लंडन वाहतूक नियामक संस्थेनं जोरदार दणका दिलाय. उबरचा लंडनसाठीचा परवानाच रद्द करण्यात आलाय. त्यामुळे लंडन शहरात १ ऑक्टोबरपासून उबर धावणार नाहीत. कंपनीची वागणूक योग्य आणि बरोबर नाहीय, आणि त्यामुळे खासगी टॅक्सी परवाना बाळगण्यास उबर योग्य नाही, असं तिथल्या नियामक संस्थेचं म्हणणं आहे. यामुळे ४० हजार उबर चालकांच्या पोटावर पाय आलाय. ३५ लाख नागरिकांची गैरसोय होईल ते वेगळंच.

पण ब्रिटनचे नागरिक गप्प बसणाऱ्यातले नाहीत. त्यांनी ऑनलाईन मोहीम सुरू केलीय, उबरला वाचवण्यासाठी. ट्विटरवर यासाठी जोरदार मोहीम सुरू आहे, ज्यासाठी ४ लाख नागरिकांनी ऑलनाईन अर्जावर आपली सही केलीय. कंपनीला जो दंड करायचाय तो करा, पण लंडनमधली सेवा बंद पाडू नका, असं नागरिकांचं म्हणणं आहे.

पण उबरनं असं काय केलं, ज्यामुळे सरकारनं एवढं कडक पाऊल उचललं? कारण थोडं क्लिष्ट आहे.  उबर लंडन नावाची वेगळी कंपनी आहे. त्याच कंपनीनं संपूर्ण कर भरावा अशी अपेक्षा आहे. पण तसं होत नाही. म्हणजे काय, तर चालकांकडून जे पैसे उबरपर्यंत पोहोचतात, ते कंपनीच्या नेदरलँड्सच्या खात्यात जमा होतात. आणि कर तिथे भरला जातो, ब्रिटनमध्ये नाही. २०१५ साली ब्रिटनमध्ये उबरची कमाई होती ४२ कोटी पाऊंड. पण २०१६ साली ब्रिटनमध्ये भरला गेलेला कर होता फक्त ४ लाख अकरा हजार पाऊंड. हे तिथल्या सरकारला मान्य नाही.

उबरवरचं हे एकमेव संकट नाही. काही महिन्यांपूर्वी तत्कालीन सीईओ ट्रॅव्हिस कॅलनिक यांना राजीनामा द्यावा लागला होता. कंपनीत अनेक गैरप्रकार होतायेत, म्हणून गुतवणूकदारांनी त्यांना पद सोडायला लावलं. भारतासह अनेक देशांमध्ये उबरची चलती असली तरी आजच्या जगात प्रतिमा जपणंही तेवढंच महत्वाचं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2017 06:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...