Home /News /videsh /

या मुस्लीम देशात Live in साठी परवानगी, दारूवरचे निर्बंध शिथिल, ऑनर किलिंगसाठी कठोर शिक्षा

या मुस्लीम देशात Live in साठी परवानगी, दारूवरचे निर्बंध शिथिल, ऑनर किलिंगसाठी कठोर शिक्षा

नवीन नियमांनुसार मुस्लिमांना मद्यपान करण्यास सुद्धा परवानगी दिली गेली. यापूर्वी मुस्लिमांना दारू पिण्याचं लायसन्सही मिळत नसे.

    अबू धाबी, 9 नोव्हेंबर : संयुक्त अरब अमिरातीने (UAE) गेल्या आठवड्यात देशातील मुस्लीम पर्सनल लॉ (Islamic Laws) सुधारण्यासाठी अनेक मोठे आणि महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले. कायद्यात हे बदल झाल्यानंतर आता अविवाहित जोडप्यांना एकत्र (Live in Relationship) राहण्याची परवानगी आहे. या व्यतिरिक्त मद्यपानावरील निर्बंधही शिथिल करण्यात आले असून आता 'ऑनर किलिंग' हा कायदेशीर गुन्हा जाहीर केला गेला आहे. मुस्लीम देशात हा कायदाबदल महत्त्वपूर्ण मानला जात आहे. जगात देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे बदल करण्यात आले असल्याचं मानलं जात आहे. UAE ने वैयक्तिक स्वातंत्र्याशी संबंधित इस्लामिक कायदे शिथिल करण्याची घोषणा केली आहे. संयुक्त अरब अमिराती वर्ल्ड एक्स्पोचं आयोजन करत असल्यामुळे त्यांच्या कायद्यांमध्ये आवश्यक बदल केले गेले आहेत, असंही सांगण्यात येत आहे. हे बदल गेल्या काही दिवसांपासून युएई राज्यकर्त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत झालेल्या बदलांना दाखवतात. जगातील इतर देशांसारखेच युएईच्या लोकांनाही वैयक्तिक स्वातंत्र्य हवं आहे. शिवाय अमेरिकेच्या पुढाकाराने झालेला युएई आणि इस्त्राईल यांच्यातील करारदेखील एक कारण असू शकतो. करारानंतर इस्राईलमधून येथे मोठ्या संख्येने पर्यटकांसह गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त युएई दुबईसह देशातील सर्व शहरे पर्यटनस्थळं म्हणून विकसित करत आहेत. देशाची प्रतिमा सुधारेल, पर्यटन वाढेल सरकारी डब्ल्यूएएम न्यूज एजन्सी आणि द नॅशनल या वृत्तपत्रात जाहीर केलेल्या कायदेशीर सुधारणांनुसार 21 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना दारू जवळ बाळगणं, त्याचं सेवन आणि विक्री करण्यासाठी कोणताही दंड भरावा लागणार नाही. यापूर्वी एखाद्याला दारू विकत घेण्याचा, ते घेऊन जायचा आणि घरी ठेवण्याचं लायसन्स घ्यावं लागत होतं. नवीन नियमांनुसार मुस्लिमांना मद्यपान करण्यास सुद्धा परवानगी दिली गेली. यापूर्वी मुस्लिमांना दारू पिण्याचं लायसन्सही देण्यास बंदी होती. युएईच्या सरकारी न्यूज एजन्सीने या शाही फर्मानाविषयी माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की या सुधारणांचं उद्दिष्ट देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठेला प्रोत्साहित करण्यासाठी आणि जगाला हा संदेश देण्यासाठी आहे की ते सहिष्णुतेची तत्त्वे मजबूत करीत आहेत. नवीन नियमांनुसार जोडप्यांना लग्न न करताही सोबत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत युएईमध्ये हा गुन्हा होता. धार्मिक व सांस्कृतिक नियमांचे उल्लंघन किंवा अनादर केल्याबद्दल महिलांच्या हत्येचे तसेच छळ करण्याचे समर्थन करणारे नियम रद्द केले गेले आहेत. सन्मानाच्या नावाखाली महिलांचा होणारा छळ हा आता त्यांच्यावरील इतर हल्ल्यांप्रमाणेच गुन्हा बनला आहे. अश्या देशात जिथे स्थलांतरितांची संख्या वाढत आहे तिथे या सुधारणांमुळे परदेशी लोकांना लग्न, घटस्फोट आणि उत्तराधिकार या गोष्टींसाठी शरिया न्यायालयात जावे लागणार नाही. युएई लवकरच वर्ल्ड एक्सपो आयोजित करणार असताना अशा वेळी हे बदल करण्यात आले आहेत. या कार्यक्रमामुळे फक्त व्यवसाय वाढणार नाही तर अडीच कोटींहून अधिक लोकांची ये-जा देखील होईल.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Relationship, UAE

    पुढील बातम्या