पेशावर, 15 मे : पाकिस्तानच्या पेशावरमधून
(Peshawar Pakistan) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे शीख समुदायाच्या दोन जणांची हत्या
(Sikh Person Murder) करण्यात आली आहे. कुलजीत सिंह (42) आणि रंजीत सिंह (38) ही मृतांची नावे आहेत. अज्ञातांनी या दोन जणांची हत्या केली.
मसाला विकायचे शीख बांधव
स्थानिक पोलिसांनी सांगितले की, दोन्ही दुकानदार हे सरबंद परिसरातील बाट ताल बाजारात मसाला विकायचे. पाकिस्ताना अल्पसंख्याक समाजातील लोकांवर नेहमीच हल्ले केले जातात. यात हिंदू आणि शीख दोन्ही समुदायांचा समावेश आहे. हल्लेखोर दुचाकीवर आले होते. गोळ्या झाडल्यावर लगेचच ते फरार झाले. आतापर्यंत या प्रकरणात कोणलाही अटक झालेली नाही. सोशल मीडियावर या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ विचलित करणारे आहेत. दुकानात दोघांचा मृतदेह पडलेले आहेत. तसेच आजूबाजूला रक्ताचा सडा पडल्याचे दिसत आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री काय म्हणाले?
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनीही पेशावरमध्ये शीख नागरिकांच्या हत्येबद्दल चिंता आणि निषेध व्यक्त केला आहे. शीख नागरिकांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच कुणालाही धार्मिक सलोखा बिघडवू देणार नाही, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री महमूद खान यांनी व्यक्त केला निषेध
खैबर पख्तूनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी या हल्ल्याची निषेध केला आहे. तसेच दोषींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. ही घटना दोन्ही धर्मातील संबंध बिघाडण्याचे काम आहे. मृतांच्या परिवाराला नक्कीच न्याय दिला जाईल, असे ते म्हणाले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सांगितले की, अपराध्यांना पकडण्यासाठी त्यांनी परिसराला घेरले आहे. दरम्यान, आतापर्यंत कोणीच या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली नाही.
हेही वाचा - अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये 18 वर्षीय तरुणाचा गोळीबार; हल्ल्यात 10 ठार
मागील आठ महिन्यात शीख समुदायावरचा हा दुसरा हल्ला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पेशावरमध्ये प्रसिद्ध शीख 'हकीम' यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. पेशावरमध्ये जवळपास 15 हजार शीख धर्माचे लोक राहतात. यातील सर्वाधिक हे जोगन शाह इथे राहतात. पेशावर मध्ये शीख समुदाय लोक व्यवसायाशी संबंधित आहेत. तर काही फार्मसीही चालवतात.
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने व्यक्त केला निषेध -
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने या हत्येचा तीव्र निषेध केला आहे. एसजीपीसीचे अध्यक्ष अधिवक्ता एस. हरजिंदर सिंग म्हणाले की, अल्पसंख्याकांच्या अशा हत्या ही संपूर्ण जगासाठी आणि विशेषत: शीखांसाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. “आम्ही पेशावर, खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तान येथे दोन शीखांच्या भ्याड हत्येचा तीव्र निषेध करतो. दोन्ही देशांच्या सरकारांनी पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या अल्पसंख्याक शीखांच्या जीवित आणि मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.