तुर्की, 28 ऑक्टोबर : भारतामध्ये फेसबुक, ट्विटर, अशा सोशल मीडिया (social media) प्लॅटफॉर्मवर आपली मतं व्यक्त करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेकदा एखाद्या ट्विटमुळे मोठे वादही उद्भवले आहेत. परंतु केवळ ट्विट करताना त्यामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्यामुळे थेट जेलमध्ये जाण्याची वेळ एखाद्यावर आल्याचं भारतामध्ये तरी सहसा पाहण्यास मिळत नाही. इस्लामिक देश (Islamic countries) असणाऱ्या तुर्की (Turkey) येथे मात्र केवळ एका ट्विटमुळे (tweet) एका महिलेवर जेलमध्ये जाण्याची वेळ आली आहे. हे ट्विट पुरुषांचा अपमान करणारं आहे, असा आरोप संबंधित महिलेवर ठेवण्यात आला आहे.
इस्लामिक देशांमध्ये पुरुषांच्या विरोधात बोलणं एखाद्या गुन्ह्यापेक्षा कमी नाही. एका तुर्की महिला कार्यकर्तीला (female activist) केवळ पुरुषांबद्दल ट्विट केल्यामुळे पाच महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने संबंधित महिलेने केलेलं ट्विट पुरुषांचा अपमान करणारं मानलं आणि तिला शिक्षा सुनावली. मात्र, हे वादग्रस्त ट्विट मी केलंच नाही, असे संबंधित महिलेचं म्हणणं असून तिने आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, लेखिका आणि महिला हक्क कार्यकर्त्या 34 वर्षीय पिनार यिलदिरिम (Pinar Yildirim) यांना पाच महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुरुषांचा अपमान केल्याप्रकरणी त्या दोषी आढळल्या आहेत. याविरोधात पिनार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु तेथेही पिनार यांच्याविरोधात निकाल गेल्यास त्यांना तुरुंगात जावं लागेल. यावर पिनार म्हणाल्या की, 'ज्या देशात महिलांचा प्रत्येक क्षेत्रात अपमान होतो, तिथे एका महिलेच्या ट्विटवर एवढा गदारोळ होत आहे, हे समजण्याच्या पलीकडे आहे.'
पिनार यिलदिरिम यांनी दावा केला आहे की, 'त्यांच्या ट्विटमध्ये छेडछाड करण्यात आली आहे.' त्या म्हणाल्या, मी 'आय डोंट लाइक मेन' असं ट्विट कधीच केलं नाही. मी 'आय स्टील लाइक मेन' असं ट्विट केलं होतं. पुरुषांचा अपमान करणारं जे ट्विट सांगण्यात येत आहे, आणि ज्यामुळे मला शिक्षा सुनावण्यात आली आहे, ते ट्विट माझं नाही. मी ते लवकरच सिद्ध करेन.’ दुसरीकडे न्यायालयाच्या या निर्णयामुळे महिलांमध्ये संतापाचं वातावरण आहे. आक्षेपार्ह ट्विटसाठी तुरुंगात पाठवणं अन्यायकारक असल्याचं त्यांचं मत आहे.
पिनार यांनी सांगितलं की, 'त्यांनी नेटफ्लिक्सवरील एका वेब सीरिजच्या संबंधात 'आय स्टील लाइक मेन' असं ट्विट केलं होतं, ज्याला रेडिओ अँड टेलिव्हिजन सुप्रीम कौन्सिलने समलैंगिकतेला प्रोत्साहन देणारं म्हटलं आहे. माझं हे ट्विट छेडछाड करून 'आय डोंट लाइक मेन' असं करण्यात आलं आहे.' त्या पुढे म्हणाल्या, 'मी अनेक गे चित्रपट, शो पाहिले आहेत, पण मी समलैंगिक नाही. मला अजूनही पुरुष आवडतात आणि मी माझ्या ट्विटमध्ये तेच म्हटलं आहे. महिला पत्रकाराशी गैरवर्तन करणाऱ्या आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला नुकतीच न्यायालयाने शिक्षा देण्यास नकार दिला होता. मग माझ्या बाबतीत इतका कठोर निर्णय का ?,’ असा प्रश्नही पिनार यांनी उपस्थित केला आहे.
तुर्की येथे एका महिला कार्यकर्तीच्या ट्विटमुळे मोठा वाद उद्भवला आहे. आता या महिलेला उच्च न्यायालयात दिलासा मिळणार का? तिला इतर महिलांचा पाठिंबा, सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळणार का ? याकडे लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.