ट्रम्प-किम जोंग यांच्या ऐतिहासिक चर्चेची दुसरी फेरी सकारात्मक

ट्रम्प-किम जोंग यांच्या ऐतिहासिक चर्चेची दुसरी फेरी सकारात्मक

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातल्या चर्चेची पहिली फेरी सकारात्मक झाली अशी माहिती अध्यक्ष ट्रम्प यांनी दिली.

  • Share this:

अजय कौटिकवार

सिंगापूर, ता. १२ जून :  अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्यातल्या चर्चेची दुसरी फेरी यशस्वी झालीय.  ट्रम्प यांनी तसे संकेत दिले. करारावर किम यांचं मन वळवण्यात ट्रम्प यांना यश आल्याचे अमेरिकेनं संकेत दिलेत.

उत्तर कोरियाजवळ असलेला अण्वस्त्रांचा साठा नष्ट करणं आणि भविष्यात अण्वस्त्र तयार करणार नाही याची उत्तर कोरियाकडून हमी  घेणं हे अमेरिकेचं या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट आहे.

सिंगापूरच्या सेंटोसा बेटावरच्या कॅपेला हॉटेलमध्ये ही ऐतिहासिक चर्चा सुरू आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी साडे सहाच्या सुमारास हे दोन्ही नेते हॉटेलच्या लॉबीमध्ये पहिल्यांदा समोरासमोर आले. गेल्या ६० वर्षातली अमेरिका आणि उत्तर कोरियाच्या सर्वोच्च नेत्यांमधली ही पहिलीच भेट आहे.

भेटल्यानंतर दोघांनीही हस्तांदोलन करत पत्रकारांना पोझ दिली. यावेळी किम आणि ट्रम्प यांच्यावर कुठलाही दबाव दिसत नव्हता. अतिशय मोकळेपणानं ते एकमेकांशी हितगुज करत होते. ६० सेकंदांच्या या हस्तांदोलनानंतर किम आणि ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन थोडक्यात आपल्या भावना व्यक्त केल्या.

काय म्हणाले ट्रम्प आणि किम

डोनाल्ड ट्रम्प

– ही चर्चा उत्तमच होईल. या चर्चेतुन भरीव असं काही निघावं असा आमचा प्रयत्न राहील. चर्चा यशस्वी होईल. हा माझा सन्मान समजतो. दोन्ही देशांचे संबंध सुधारतील यात शंकाच नाही.

किम जोंग उन

– वाईट भूतकाळ, पूर्वग्रह आणि वैरभावना मागे सारत मी इथं आलो आहे. इथपर्यंत येण्याचा मार्ग काही सोपा नव्हता. या सर्व गोष्टींवर मात करत इथपर्यंत येणं ही मोठी गोष्ट आहे.

या पत्रकार परिषदेनंतर दोनही नेत्यांची हॉटेलच्या लॅब्ररीमध्ये चर्चा सुरू झाली. यावेळी त्यांच्यासोबत फक्त दुभाषिकच उपस्थित होते. ही चर्चा ५० मिनिटं चालली. चर्चेची ही पहिली फेरी झाल्यानंतर हे नेते प्रतिनिधी मंडळासोबत भेटले.

पहिल्या फेरीची चर्चा अतिशय सकारात्मक झाल्याची प्रतिक्रिया ट्रम्प यांनी व्यक्त केली ही चर्चा दुसऱ्या टप्प्यातही सुरू राहणार असून एका ज्वलंत प्रश्नावर तोडगा निघेल अशी आशा आहे असं ट्रम्प म्हणाले.

तर जगाला ही भेट म्हणजे एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखी वाटतेय अशी प्रतिक्रिया किम जोंग उन यांनी व्यक्त केली. दरम्यान. दोनही नेते दुपारचं जेवण एकत्र घेणार असून त्यावेळीही त्यांच्यात अनौपचारिक चर्चा होणार आहे.

पहिल्या एका मिनिटात चर्चा योग्य वळणावर राहिली नाही तर मी बैठक सोडून बाहेर येईल असं ट्रम्प काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. काही महिन्यांपर्यंत किम आणि ट्रम्प यांनी एकमेकांना शिव्यांची जाहीरपणे लाखोळी वाहिली होती.

उत्तर कोरियाला नेस्तनाबूत करू अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती तर अमेरिकेच्या शहरांवर अणुबॉम्ब टाकू असा इशारा किम जोंग उन यांनी दिला होता. त्यामुळं जग तिसऱ्या महायुद्धाच्या जवळ तर जात असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. या चर्चेमुळं जगाच्या राजकारणात एका नव्या अध्यायाला सुरवात झाली आहे अशी प्रतिक्रिया जगभरातून व्यक्त होत आहे.

First published: June 12, 2018, 9:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading