वॉशिंग्टन, 9 ऑक्टोबर : जगभरात कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात पसरलं आहे. जगभरात लाखो रुग्णांचा यामुळे जीव दगावला आहे. अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाचे बळी गेले असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देखील नुकताच कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अमेरिकेत आतापर्यंत 2 लाख 16 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर उपचार केल्यानंतर आता व्हाईट हाऊसमध्ये परतले आहेत. त्यानंतर आता त्यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.
यामध्ये कोरोना व्हायरस माझ्यासाठी ईश्वरी वरदान असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये त्यांनी कोरोना व्हायरससाठी चीनला जबाबदार ठरवलं आहे. तसेच यामुळं मला या आजाराविषयी असणाऱ्या औषधांची देखील माहिती मिळाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. याविषयी अधिक बोलताना ट्रम्प म्हणाले, चीनने सर्व जगाला हा आजार दिला असून त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ट्रम्प यांनी डॉक्टरांच्या उपचारांचं कौतुक केलं आहे. ट्रम्प अजूनही कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर देखील व्हाईट हाऊसमध्ये उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर अमेरिकेतील नागरिकांना या आजारावरील औषधं मोफत देण्याचं आश्वासन देखील त्यांनी या व्हिडिओमध्ये दिलं आहे. या सगळ्यात ट्रम्प यांच्या तब्येतीची सर्वांना चिंता आहे. ट्रम्प यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर शॉन कॉनली यांनी सुरुवातील सांगितलं होतं की ट्रम्प यांना ऑक्सिजन लावायला लागला होता. पण नंतर त्यांनी सांगितलं की त्यांची तब्येत इतकी खराब झाली नव्हती. ट्रम्प आपल्या तब्येतीची योग्य माहिती देत नसल्यानं चिंता वाढत आहे, असंही म्हटलं जातंय.
हे ही वाचा-NOBEL PEACE Prize 2020 : ट्रम्प यांना नाही मिळालं शांततेचं नोबेल
रविवारी ट्रम्प यांना dexamethasone औषध देण्यात आलं होतं, असंही कॉनलींनी सांगितलं होतं. हे औषध श्वास घेण्यास खूप त्रास होत असेल तर देण्यात येतं. त्यामुळे ट्रम्प यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त होतच आहे. सन फ्रान्सिस्कोमधील कॅलिफोर्निया विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ मेडिसिनचे प्रमुख रॉबर्ट वॉकटर म्हणाले, 'ट्रम्प यांना सध्या ICU पासून 50 फूट दूर राहणं गरजेचं आहे.कारण ते गंभीर आजारी आहेत.' ट्रम्प यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर कॉनली यांनी ट्रम्प डिस्चार्ज देण्याच्या सर्व मानकांमध्ये पास झाले आहेत. डिस्चार्ज मिळाल्यानंतर पहिली रात्र आरामात गेली होती. सामान्य नागरिकांनी आपण लगेच बरे होऊ असा गैरसमज करून घेऊ नये असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.