18 मे : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताचा मोठा विजय झालाय. आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली. तसंच कुलभूषण जाधव यांच्या जिवाची जबाबदारी ही पाकिस्तानची आहे असं कोर्टाने स्पष्ट शब्दात सुनावलंय.
या ना त्या मार्गाने कुरापत्या करणाऱ्या पाकिस्तानने यावेळी भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना गुप्तहेर ठरवून लगेच फाशीची शिक्षा सुनावली. पाकच्या या कपट्टी भूमिकेच्या विरोधात भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टात दाद मागितली. आणि आज आंतरराष्ट्रीय कोर्टात सत्याचा विजय झाला. खोटे आरोप करणारा पाकिस्तान तोंडावर आपटलाय. आंतरराष्ट्रीय कोर्टाचे न्यायाधीश जस्टिस रोनी अब्राहम यांच्यासमोर दोन्ही देशांनी जोरदार युक्तिवाद केला. भारताकडून ज्येष्ठ वकील हरीष साळवे यांनी कुलभूषण यांची बाजू मांडली.
दोन्ही देशाच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर जस्टीस रोनी अब्राहम यांनी दुपारी 3.30 च्या सुमारास निकालाचं वाचन सुरू केलं. निकालाआधीच पराभव समोर दिसत असल्यामुळे आधीच पाकिस्तानने आदळआपट करत निकाल मान्य नसल्याचं जाहीर करून टाकलं.
रोनी अब्राहम यांनी आपल्या निकालात पाकिस्तानचे सर्व दावे फेटाळून लावले. हा मुद्दा न्यायालयाच्या कक्षेत येत नाही असा मुद्दा पाकिस्तानने उपस्थित केला होता. त्यावर गुप्तहेर आणि दहशतवादी कारवायाशी संबंधित प्रकरणही न्यायालयाच्या कक्षेत येवू शकतात असं न्यायाधीश अब्राहम यांनी ठणकावून सांगितलं. कुलभुषण जाधव हेर असल्याचे पाकिस्तानकडे पुरेसे पुरावे नाहीत. जाधव यांच्या अटकेची माहिती भारताला द्यायला पाहिजे होती. हा भारताचा युक्तिवाद योग्य आहे असंही न्यायाधीशांनी स्पष्ट केलं.
जाधव यांना सर्व कायदेशीर मदत घेण्याचा अधिकार आहे. त्यांना वकिल घेण्याचा पूर्ण अधिकार आहे असंही न्यायाधीशांनी स्पष्ट केलं. कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देत अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषणला फाशी देता येणार नाही. त्यांच्या जीवाची जबाबदारीही पाकिस्तानची आहे असं न्यायाधीशांनी स्पष्ट केलं.
आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताचा हा मोठा विजय आहे. या विजयामुळे देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलंय. कोर्टाच्या या निर्णयामुळे कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांसह देशाला मोठा दिलासा मिळालाय असं स्वराज यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलंय.
The ICJ order has come as a great relief to the familly of Kulbhushan Jadhav and people of India.
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) May 18, 2017
We are grateful to Mr.Harish Salve for presenting India's case so effectively before ICJ.
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) May 18, 2017