बिजिंग, 8 जानेवारी : जर ऑफिसमध्ये असताना वॉशरुमला जायचं असेल, आणि कोणी न जाऊ दिल्यास काय होईल? ऑफिसमध्ये टॉयलेटला जाण्यापासून कुणी रोखलं तर काय होईल अवस्था? अशीच काहीशी पॉलिसी एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बनवली आहे. ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना टॉयलेटला जायला तर देते, पण एकाहून अधिक वेळा टॉयलेटला गेल्यास, दंड भरावा लागतो.
ही हुकूमशाही वृत्ती चीनच्या अनपू इलेक्ट्रिक सायन्स अँड टेक्नोलॉजी कंपनीने स्वीकारली आहे. गुआंगडॉग राज्यातील डॉन्ग गुआंगमध्ये असलेल्या या कंपनीचा हा नियम सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे. एका दिवसांत एक टॉयलेट ब्रेक (Once A Day Toilet Break Policy) ही पॉलिसी स्वीकारली असल्याचं कंपनीने मान्य केलं आहे. कर्मचारी एकापेक्षा जास्त वेळ टॉयलेटला गेल्यास, त्याला प्रत्येक वेळी 20 युआन म्हणजेच 3 डॉलर जवळपास 220 रुपये दंड स्वरुपात भरावे लागतील. कंपनीने हे पाऊल अशा आळशी कर्मचाऱ्यांमुळे उचललं आहे, जे काम करण्यावेळी, कामापासून वाचण्यासाठी मुद्दाम अनेक वेळा टॉयलेट ब्रेक घेतात.
या पॉलिसीबाबत काय आहे कंपनीचं म्हणणं?
कंपनीने जारी केलेली नोटिस काही कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यानंतर या कंपनीविरोधात अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कर्मचाऱ्यांनी नोटिस व्हायरल केल्यानंतर 7 कर्मचाऱ्यांना 20 आणि 21 डिसेंबर रोजी काढून टाकण्यात आलं होतं. सोशल मीडियामधून या कंपनीवर मोठी टीका होत असली, तरी कंपनी या गोष्टीवर ठाम आहे की, कंपनीचे अनेक कर्मचारी आपली जबाबदारी आणि कामापासून वाचण्यासाठी अधिक टॉललेट ब्रेक घेत असल्याने असं करण्यात आलं आहे.
कंपनीच्या प्रवक्तांनी सांगितलं की, आम्हाला असं करण्यास भाग पाडलं जात आहे, कारण कंपनीचे कर्मचारी आळशी आहेत. ते आपल्या कामापासून पळ काढण्याचा, वाचण्याचा प्रयत्न करतात. कंपनीने कर्माचाऱ्यांशीही याबाबत अनेकदा चर्चा केली, मात्र त्यांच्यात कोणताही सकारात्मक बदल पाहायला मिळाला नसल्याचं कंपनी प्रवक्तांनी सांगितलं.
कर्मचारी काम करत नसल्याने, त्यांना नोकरीवरुन काढण्यापेक्षा, त्यांना दंड लावणं हा पर्याय चांगला असल्याचं प्रवक्ते म्हणाले. जे कर्मचारी एकापेक्षा अधिक वेळा टॉयलेटला जातील, त्यांना त्याच वेळी दंड भरावा लागणार नाही, तर तो दंड त्यांच्या मासिक पगारातून कापला जाईल. ज्या कर्मचाऱ्याला एकाहून अधिक वेळा टॉयलेटला जायचं असेल, त्याला आपल्या बॉसकडे रजिस्टर्ड करूनच जावं लागेल, असंही ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.