न्यूयॉर्क, 11 डिसेंबर: हॉरर फिल्म्स पाहण्याची आवड अनेकांना असते, तर काहींना अजिबात असे चित्रपट पाहता येत नाहीत. त्याचप्रमाणे अशा 'हॉरर' घटना खऱ्या आयुष्यात घडल्याचंही अनेकजण सांगतात. काही घटना तर गैरसमजामुळेच भीतीदायक वाटतात. अमेरिकेत (America) एका महिलेबरोबर अशीच एक विचित्र घटना घडली आहे. नवीन घर घेतल्यानंतर ही महिला या ठिकाणी राहायला आली होती. पण तिच्याबरोबर घडलेल्या एका भयानक प्रसंगाने ती चांगलीच हादरून गेली आहे. या महिलेला तिच्या नव्या घराच्या बेसमेंटमध्ये भिंतीत गाडलेली बाहुली आढळून आली. या बाहुलीचं केवळ तोंड दिसत असल्याने ती खूपच भयानक दिसते आहे.
या महिलेने काही दिवसांपूर्वीच हे नवीन घर खरेदी केलं आहे. त्यानंतर घराची पाहणी करताना ती बेसमेंटमध्ये गेली होती. बेसमेंटमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरील दृश्य पाहून तिला हादराच बसला. त्याठिकाणी भिंतीमध्ये एक बाहुली गाडलेली दिसली. मुख्य म्हणजे या बाहुलीचा केवळ चेहऱ्याचा काही भाग भिंतीच्या बाहेर होता. त्यामुळे ही बाहुली पाहून तिला धक्का बसला. तिच्याजागी कुणीही असतं तर भीती वाटलीच असती.
(हे वाचा-जगभरात ठिकठिकाणी दिसणाऱ्या Monolith चं नेमकं रहस्य काय?)
या महिलेच्या बहिणीने 3 डिसेंबरला या बाहुलीचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या बहिणीच्या यो ट्विटर पोस्टवर खूप कमेंट्स येत आहेत. आतापर्यंत 5 लाखापेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. अनेकजणांनी या महिलेला सल्लादेखील दिला आहे. या फोटोमध्ये बाहुलीला ज्या पद्धतीने गाडण्यात आले आहे ते खूपच धक्कादायक आणि भीतीदायक आहे. हे दृश्य पाहून कुणालाही भीती वाटेल.
दरम्यान, ट्विटवर (twitter)या घराच्या मालकिणीला अनेक जणांनी लवकरात लवकर ही बाहुली घरातून बाहेर काढण्याचा सल्ला दिला आहे. तर काही जणांनी या महिलेला घरातून निघून जाण्याचा सल्ला दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.