Home /News /videsh /

कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर सावधान! पुढील 2 वर्षांपर्यंत धोका कायम

कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर सावधान! पुढील 2 वर्षांपर्यंत धोका कायम

कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींना बरं झाल्यानंतरही दुखी आणि बेचैनीची समस्या कायम होती. तसंच, चिंता (Anxiety) आणि डिप्रेशनचाही (Depression) सामना त्यांना करावा लागत होता, असंही लक्षात आलं.

    नवी दिल्ली, 12 मे : जगातल्या चीनसारख्या काही देशांचा अपवाद वगळता कोरोनाचा संसर्ग आता बऱ्यापैकी आटोक्यात आला आहे. कोरोनाबद्दलचं संशोधन निरंतर सुरूच आहे. त्यामुळे दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. 'लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसिन'मध्ये (Lancet Study) कोरोनाबद्दलच्या एका नव्या संशोधनाविषयीची माहिती प्रसिद्ध झाली आहे. त्या संशोधनात असं आढळून आलं आहे, की कोरोना संसर्गामुळे ज्यांची प्रकृती गंभीर झाली होती, त्यांपैकी जवळपास निम्म्या रुग्णांना एखाद-दोन संबंधित लक्षणं पुढच्या दोन वर्षांपर्यंत त्रास देऊ शकतात. ज्या रुग्णांना कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं, अशा रुग्णांच्या बाबतीत असं होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चीनमध्ये 2020मध्ये सर्वांत पहिल्यांदा कोरोनाचा संसर्ग उद्भवला होता, त्या चीनमधल्या रुग्णांच्या आधारे हे संशोधन करण्यात आलं आहे. चीनमधल्या (China) चीन-जपान मैत्री हॉस्पिटलमधले प्रोफेसर बिन काओ यांनी सांगितलं, की कोविड-19मुळे जे रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते, ते औषधोपचारांनी बरे झाले; मात्र त्यांना पूर्णपणे बरं होण्यासाठी किमान दोन वर्षं लागतील, असं आमचं संशोधन सांगतं. लाँग कोविडशी झुंज देत हॉस्पिटलमध्ये असलेल्या पेशंटच्या सातत्यपूर्ण तपासणीतून असा निष्कर्ष निघाला आहे, की ते पेशंट पूर्णपणे बरे होण्यासाठी विशिष्ट कार्यक्रम निश्चित केला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या आजारपणाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवता येऊ शकेल, असंही प्रा. बिन काओ यांनी सांगितलं. अशा प्रकारच्या कोरोनाबाधितांवर लशी, उपचार आणि व्हॅरिएंट्स या सगळ्यामुळे नेमका काय परिणाम झाला आहे आणि तो किती काळासाठी झाला आहे, याची नेमकी माहिती मिळण्यासाठी अशा रुग्णांवर बारकाईने आणि सातत्याने लक्ष ठेवलं जाणं आवश्यक असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. सर्वसाधारण व्यक्तींच्या तुलनेत अशा व्यक्तींच्या आरोग्याच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम झाला आहे. त्यात थकवा, श्वास घ्यायला त्रास होणं, झोप न येणं आदी समस्यांचा समावेश आहे. वुहानमधल्या जिन यिन-टेन हॉस्पिटलमधल्या कोविड-19मुळे (Covid19) प्रकृती गंभीर झालेल्या 2469 रुग्णांवर हे संशोधन करण्यात आलं होतं. 7 जानेवारी 2020 ते 29 मे 2020 या कालावधीत कोविडमधून बऱ्या झालेल्या रुग्णांची लक्षणं या अभ्यासादरम्यान 6 महिने, 12 महिने आणि दोन वर्षांच्या कालावधीने नोंदवण्यात आली. कोरोना संसर्ग झाल्यानंतर सहा महिन्यांनी सुमारे 68 टक्के रुग्णांनी लाँग कोविडचं किमान एक तरी लक्षण दिसत असल्याची तक्रार केली. संसर्गानंतर दोन वर्षांनंतर लक्षणं कमी झाल्याची नोंद करण्यात आली. तेव्हा ही संख्या 55 टक्क्यांवर आली. थकवा आणि स्नायूंमध्ये कमजोरी ही तक्रार सर्वाधिक वेळा नोंदवली गेली; मात्र सुरुवातीच्या सहा महिन्यांत जेव्हा तक्रार करणाऱ्यांची टक्केवारी 52 टक्के होती, ती दोन वर्षांनी घटून 30 टक्क्यांवर आली. (Long Covid) दोन वर्षांनंतर जे रुग्ण आजारी पडले होते, त्यापैकी 31 टक्के जणांनी थकवा, स्नायूंमध्ये कमजोरी, तसंच झोप न येण्याची तक्रार केली, असं त्या संशोधनात आढळलं. भारतातल्या डॉक्टर्सनाही त्यांच्या रुग्णांमध्ये अशाच प्रकारची लक्षणं आढळून आली आहेत. 'एम्स'च्या पल्मोनरी मेडिसीन विभागाचे माजी प्रमुख डॉ. जी. सी. खिलनानी म्हणतात, 'दीड वर्ष होऊन गेल्यानंतरही अनेक रुग्ण थकवा, स्नायूंमध्ये कमजोरी, सांधेदुखी, झोप न येणं किंवा झोप कमी होणं, पोट खराब होणं अशा तक्रारी घेऊन येत आहेत. ज्यांच्या फुप्फुसांत संसर्ग झाला होता, अशा व्यक्तींमध्ये ही लक्षणं जास्त गंभीर स्वरूपात दिसत आहेत. आता चीनमध्ये करण्यात आलेलं संशोधन एकाच ठिकाणी करण्यात आलं आहे; मात्र याच्या व्यापक अभ्यासाची गरज आहे, जेणेकरून काही ठोस निष्कर्ष काढून ही लक्षणं दिसणाऱ्या व्यक्तींवर योग्य उपचार करता येतील.' 'आज तक'च्या वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, सर्वसामान्य व्यक्तींच्या तुलनेत कोरोनातून (Corona) बऱ्या झालेल्या व्यक्तींच्या आरोग्याची स्थिती फारशी चांगली नव्हती. कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींना बरं झाल्यानंतरही दुखी आणि बेचैनीची समस्या कायम होती. तसंच, चिंता (Anxiety) आणि डिप्रेशनचाही (Depression) सामना त्यांना करावा लागत होता, असंही लक्षात आलं. या अभ्यासातल्या 2469 रुग्णांपैकी 1192 जण कोरोना बरा झाल्यानंतर 2 वर्षांपर्यंत डॉक्टर्सकडे तक्रारी घेऊन येत होते. 777 जणांना 6 महिन्यांनंतरही एक तरी लक्षण दिसत होतं, तर 650 जणांना दोन वर्षांनंतरही एक तरी लक्षण दिसत होतं. थकवा आणि स्नायूंची कमजोरी असण्याच्या तक्रारी सर्वाधिक होत्या. 250 जणांना 6 महिन्यांनंतरही चिंता आणि तणाव होता. 2 वर्षांनंतर अशा रुग्णांची संख्या 143 पर्यंत खाली आली, असं निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं.

    First published:

    Tags: Corona, Covid-19, Covid-19 positive

    पुढील बातम्या