...तर भारतासोबतचं युद्ध अटळ, चीनची दर्पोक्ती

भारत-चीनच्या सीमेवरचा तणाव दिवसेंदिवस वाढतच चाललाय. सिक्किम आणि डोकलाम परिसरातील वर्चस्वाच्या मुद्यावरून हे उभय देशांमध्ये वाकयुद्ध पेटलंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 5, 2017 12:58 PM IST

...तर भारतासोबतचं युद्ध अटळ, चीनची दर्पोक्ती

नवी दिल्ली, (वृत्तसंस्था) 5 जुलै: भारत-चीनच्या सीमेवरचा तणाव दिवसेंदिवस वाढतच चाललाय. सिक्किम आणि डोकलाम परिसरातील वर्चस्वाच्या मुद्यावरून हे उभय देशांमध्ये वाकयुद्ध पेटलंय. भूतानच्या डोकलाम परिसरात चीनच्या रस्तेबांधणीस भारताने विरोध केला आहे. तर या परिसरातील भारतीय सैन्याचे बंकर चीनने नष्ट केलेत. त्यावरून गेला महिनाभर सीमाभागात तणाव वाढलाय. ही परिस्थिती गंभीर आहे. मात्र त्यातून मार्ग काढणे आता भारताच्याच हातात आहे. त्यासाठी भारताने डोकलाम भागात वाढवलेलं सैन्य मागे घेतलं तरच शातंतामय वाटाघाटी होऊ शकतात, असे भारतातील चीनचे राजदूत  ल्युओ झाओहुइ यांनी म्हटलंय.

दरम्यान, डोकलाम भागातील भारतीय सैन्याचे बंकर नष्ट करण्यासाठी चिनी सैन्याने बुलडोझरचा वापर केला नव्हता. तसंच सिक्किमच्या नथु ला क्षेत्रात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली नव्हती, असं भारतीय लष्कराने म्हटलं आहे. यापूर्वी केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चीनने भारतीय बंकर नष्ट करण्यासाठी बुलडोझर वापरल्याचं म्हटलं होतं. लष्कराच्या प्रवक्त्याने असेही म्हटले की, ६ जून रोजी अशी घटना घडली नव्हती. तसेच परराष्ट्र खात्याने या घटनेची तारीख १६ जून असल्याचे यापूर्वी सांगितल्याचा उल्लेखही प्रवक्त्याने केला.

डोकलाममध्ये उद‍्भवलेल्या परिस्थितीवर कोणता पर्याय निवडायचा याचा विचार भारताने करायचा आहे. त्यामुळे आता यासंदर्भात चेंडू भारताच्या कोर्टात आहे, असे झाओहुइ यांनी सांगितले. डोकलाममधील परिस्थिती नीट हाताळली नाही तर युद्ध अटळ आहे, अशी शक्यता चीनमधील प्रसारमाध्यमे आणि तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

चीनच्याच ग्लोबल टाईम्स या सरकारी वृत्तपत्राने तर थेट युद्धाचीच धमकी देऊन टाकलीय. भारताला पुन्हा धडा शिकवण्याची योग्य वेळ आली आहे. यावेळी भारताची १९६२पेक्षाही वाईट अवस्था करू, असं ग्लोबल टाईम्स या चीनच्या सरकारी वृत्तापत्रात म्हटले आहे. २०१७ चा भारत आणि १९६२ ची परिस्थिती वेगळी होती, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी भारताचे संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणूनच चीनकडून जाणूनबुजून १९६२च्या युद्धाची आठवण करून दिली जातेय. पण युद्ध छेडलंच तर भारतालाच सर्वाधिक नुकसान सोसावं लागेल, असंही ग्लोबल टाईम्सच्या संपादकीय लेखात म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2017 12:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...