दिल्ली, 7 सप्टेंबर : अफगाणिस्तानात तालिबानने (Taliban) ताबा मिळवल्यानंतर आता त्यांनी सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे आता शिक्षण आणि महिला अधिकारांचं (Women's rights) काय होणार याविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे आता तालिबानने अफगाणिस्तानात (Afghannistan) कॉलेज सुरू करण्याचा (Taliban Reopen Colleges) निर्णय घेतला असल्याच्या बातम्या आणि त्यासंदर्भातील काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.
तालिबानने सुरू केलेल्या या शाळांमध्ये मुलं आणि मुलींना वेगळे बसवण्यात आले असून त्यांच्यामध्ये पडदे लावण्यात आले आहेत. या फोटोंमधून दावा करण्यात येत आहे, की अफगाणिस्तानात तालिबानच्या नियमांनुसार कॉलेज सुरू करण्यात आले असून त्यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आला आहे. तालिबानच्या भितीने अनेक महिलांनी आपले शिक्षण अर्धवट सोडून दिले आहे. 24 वर्षीय आइना नावाच्या एका विद्यार्थीनीने एका वृत्तवाहीनीला मुलाखत देताना म्हटलं आहे, की तिच्या वर्गात फक्त 50 विद्यार्थी आहेत. त्यात फक्त 3 मुली उरल्या आहेत, बाकी सगळ्यांनी कॉलेज सोडून दिले आहे.
अफगाणिस्तान कधीकाळी शिक्षणाच्या बाबतीत जगात अग्रेसर होता, आता याच्या कुठल्या पाउलखूणा उरलेल्या नाहीत, असं अफगाणिस्तानात संशोधन करणारा विद्यार्थी आदिली म्हणाला.
काबुलमध्ये पाकिस्तानविरोधी रॅलीवर तालिबानचा बेधुंद गोळीबार
याआधी जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला होता तेव्हा मोठ्या प्रमाणात महिला अधिकारांचे दमण झाले होते. महिलांना संपूर्ण अंग झाकणे बंधनकारक करण्यात आले होते, त्याचबरोबर घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे आता या वेळी तालिबानने सत्ता स्थापन केल्यानंतर महिलांना अधिकार मिळणार का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.