चीनमधल्या (China) अनेक गोष्टी भारताच्या तुलनेत अगदी वेगळ्या आहेत. तिथल्या शिक्षण पद्धतीचाही (Education System) त्याला अपवाद नाही. आपल्याकडे कोणी वर्गात झोपलं, तर त्याला शिक्षा केली जाते; पण चीनमधल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चक्क झोपण्यासाठी वेळ दिला जातो. अर्थात याचा अर्थ त्यांना सुरू असलेल्या वर्गात झोपायला दिलं जातं असा नव्हे. तिथल्या विद्यार्थ्यांकडून दोन वेळा व्यायामही करून घेतला जातो. चिनी शिक्षण पद्धतीत मूलभूत शिक्षणासोबत प्रॅक्टिकल नॉलेजवर (Practical Knowledge) भर दिला जातो. याचा उपयोग चिनी मुलांना प्रत्यक्ष जीवनात करता येतो.
चीन हा जगातल्या टॉप-5 देशांपैकी एक आहे. चीन प्रत्येक क्षेत्रात सातत्यानं प्रगती करतोय; मात्र यासाठी तिथले नागरिक आपल्या मुलांना लहानपणापासून तयार करतात, घडवतात. चीनमधल्या शाळा आणि शिक्षणपद्धती त्या दृष्टीने विशिष्ट पद्धतीने डिझाइन करण्यात आली आहे. 'टीव्ही नाइन हिंदी'ने चीनमधली एकूणच शिक्षणपद्धती आणि ती भारताच्या तुलनेत वेगळी कशी आहे, याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे.
चिनी विद्यार्थी आठवड्यातून 5 ते 6 दिवस सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत शाळेत हजर राहू शकतात. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या कालावधीत काही वेळ झोपण्याची परवानगी दिली जाते. त्यासोबतच या विद्यार्थ्यांना दिवसातून 2 वेळा व्यायाम करणं अनिवार्य आहे. इथल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना डबा खाण्यासाठी एका तासाची जेवणाची सुट्टी दिली जाते. काही शाळांमध्ये त्यानंतर विद्यार्थ्यांना झोपेसाठी वेळ दिला जातो.
हे ही वाचा-आशिया खंडात हे आहेत टॉप-7 कोरोनाबाधित देश, लसीकरणात भारताखालोखाल या देशांचा नंबर
चीनमध्ये मूलभूत शिक्षणाबरोबरच अन्य प्रकारच्या शिक्षणावरही भर दिला जातो. यात ऑक्युपेशनल, हायर आणि अॅडल्ट शिक्षणाचा समावेश असतो. भारतात प्राथमिक (Primary), उच्च प्राथमिक (Junior Secondary) आणि माध्यमिक (Senior Secondary) शिक्षण दिलं जातं. चीनमध्ये मुलांच्या शिक्षणाची सुरुवात वयाच्या 6व्या वर्षापासून होते. त्यानुसार मुलं इयत्ता पहिलीत वयाच्या 6व्या वर्षापासून जाण्यास सुरुवात करतात. हाच प्राथमिक शिक्षणाचा भाग असतो. प्राथमिक शिक्षण इयत्ता 1ली ते 6वी पर्यंत असते. वयाच्या 15 व्या वर्षापर्यंत शिक्षण घेणं चीनमध्ये अनिवार्य करण्यात आलेलं आहे. यासाठी सरकारदेखील मदत करतं.
चीनमध्ये इयत्ता 7वी ते 9वी दरम्यान होणाऱ्या परीक्षेला चुजोंग (Chuzhong), इयत्ता 10वी पर्यंतच्या शिक्षणाला गाओझोंग (Gaozhong) असं म्हणतात. यानंतर पोस्ट सेकंडरी शिक्षणाला सुरवात होते. येथे बॅचलर डिग्रीला जुशी जुवेई (Xueshi xuewei) आणि पदव्युत्तर पदवीला शुओशी जुवेई (Shuoshi xuewei) असं म्हणतात. चीनमध्ये मूलभूत शिक्षणासोबतच मुलांच्या प्रॅक्टिकल नॉलेजवर अधिक भर दिला जातो. प्रत्यक्ष जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या बाबींविषयी मुलांना विशेष शिक्षण दिलं जातं. त्याचा त्यांना स्वतःच्या आयुष्यात उपयोग होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.