श्रीलंका बाँबस्फोटांचं गुजरात कनेक्शन उघड; भारतीय तपास यंत्रणांनी आधीच व्यक्त केला होता संशय

श्रीलंका बाँबस्फोटांचं गुजरात कनेक्शन उघड; भारतीय तपास यंत्रणांनी आधीच व्यक्त केला होता संशय

या आत्मघातकी बाँबहल्ल्यांवर लक्ष ठेवणारा मार्गदर्शक सॉफ्टवेअर इंजिनिअर भारतीय गुप्तचर संस्थांच्याही संशयित दहशतवाद्यांच्या यादीत होता. त्याच्यावर भारतात चार्जशीटही दाखल झाली होती, असा मोठा खुलासा झाला आहे.

  • Share this:

कोलंबो/ अहमदाबाद, 14 मे : श्रीलंकेत ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या भीषण बाँबस्फोट मालिकेमागे कथित इस्लामी स्टेटचा (IS)सहभाग असल्याचं उघड झालं आहे. या आत्मघातकी बाँबहल्ल्यांवर लक्ष ठेवणारा आणि हल्लेखोरांना मार्गदर्शन करणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर भारतीय गुप्तचर संस्थांच्याही संशयित दहशतवाद्यांच्या यादीत होता. गुजरातेत झालेल्या सिनेगॉगमधल्या बाँबस्फोटप्रकरणी तिथल्या पोलिसांनी त्याच्यावर चार्जशीटही दाखल केली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या महिन्यात ईस्टरच्या दिवशी कोलंबोत हॉटेल्स आणि चर्चमध्ये झालेल्या बाँबस्फोटांमध्ये 250 हून अधिक जण मृत्युमुखी पडले होते.  आदिल अमीझ या 24 वर्षीय इंजिनिअरचं नाव श्रीलंका बाँबस्फोट प्रकरणी तपास करणाऱ्या श्रीलंकन यंत्रणेनं पुढे केलं आहे. या आदिलला श्रीलंकन पोलिसांनी अटक केली असून तो त्यांच्या कोठडीत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. आदिलच्या अटकेचं वृत्त अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. पण रॉयटर्सच्या बातमीदाराने विचारलं असता श्रीलंकन पोलिसांच्या प्रवक्त्याने या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बाँबस्फोटांनंतर चारच दिवसांत - 25 एप्रिललाच या आदिलला ताब्यात घेण्यात आलं होतं, असं समजतं.

आदिल अमीझवर भारतात NIA आणि गुजरात पोलिसांनी चार्जशीट दाखल केली होती. या भारतीय यंत्रणा आता श्रीलंकन तपास यंत्रणांना सहकार्य करत आहेत. भारतीय तपास यंत्रणांचा 2016  पासून आदिलवर ISIS शी संबंध असल्याचा संशय होता. अहमदाबादच्या सिनेगॉग हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपावरून त्याच्यावर चार्जशीट दाखल करण्यात आली होती. भारतात इस्लामिट स्टेटचा प्रचार करणं, दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणारा मजकूर ऑनलाईन माध्यमांतून तो फिरवत असल्याचा संशय आहे.

भारतीय गुप्तचर यंत्रणेने श्रीलंकेत हल्ला होण्याची शक्यता असल्याचा इशारा तीन वेळा श्रीलंकेला दिला होता, असं भारताने यापूर्वी स्पष्ट केलं आहे. आदिलचे ऑनलाईन चॅट आणि संपर्क इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांशी होते, असा संशय भारतीय तपास यंत्रणांना पूर्वीपासून होता.

आदिल हा मूळचा श्रीलंकेचा रहिवासी असून त्याचे वडील ए. अमीझ दक्षिण कोलंबोच्या एका उपनगरात राहतात. त्यांनी आपला मुलगा या कटात सामील असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. त्याच्यावरचे आरोप खोटे असल्याचं त्यांनी सांगितलं.

First published: May 14, 2019, 3:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading