टोक्यो 03 सप्टेंबर: दक्षिण जपानमध्ये 5800 गायी घेऊन जाणारे एक जहाज समुद्रात बुडाल्याने खळबळ उडाली आहे. या जहाजावर 43 कर्मचारी होते. खराब हवामानामुळे हे जहाज भरकटलं होतं. खराब हवामानात अडकल्याचा संदेश संदेशही बेपत्ता होण्यापूर्वी या जहाजानं पाठवला होता. त्यानंतर तटरक्षक दलाने बचाव मोहिम सुरू केली. जहाजावरच्या एका सदस्याला वाचविण्यात यश आलं आहे.
वाचलेला हा कर्मचारी हा फिलिपिन्समधला होता. जपानच्या तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला हा कर्मचारी समुद्राच्या पाण्यात आढळला. तो थकलेला आहे. मात्र त्याची प्रकृती चंगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सुमारे 11,947 टन वजनाचे हे जहाज पूर्व चीन समुद्रातील अमामी ओशिमा किनाऱ्यावरून 5,800 गायी घेऊन निघाले होते.
समुद्रात कशा प्रकारचे वादळ होते आणि हे जहाज नेमके कसे अडकले याची विस्तृत माहिती अजुन मिळू शकली नाही.
जहाजातील कर्मचाऱ्यांमध्ये 38 फिलिपिन्स, दोन न्यूझीलंड आणि एक ऑस्ट्रेलियन नागरिक आहेत. उर्वरित क्रू सदस्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. यात पाच विमाने आणि प्रशिक्षित पाणबुड्यांचा देखील समावेश आहे.
जहाजावरच्या सर्व गायी या पाण्यात बुडाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जहाजाचा ठाव ठिकाणा लागल्यानंतर त्याबाबत निश्चित माहिती मिळणार आहे. याचा समुद्राच्या पाण्यावर काही परिणाम होऊ शकतो काय याचाही अंदाज घेतला जात आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.