लाहोर, 3 डिसेंबर : सध्या पाकिस्तानमध्ये (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असून, त्यांना पदावरून हटवण्यासाठी लष्करानंही पुढाकार घेतला आहे. पाकिस्तानच्या सर्बियामधल्या (Serbia) दूतावासातल्या (Pakistan Embassy) सरकारी अधिकाऱ्यांनी अधिकृत ट्विटर हँडलद्वारे (Tweeter handle) एक संदेश प्रसारित केला असून, या संदेशाने सर्वत्र खळबळ माजवली आहे.
इम्रान खान यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. सर्बियातल्या पाकिस्तान दूतावासाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शुक्रवारी (3 डिसेंबर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक सार्वजनिक संदेश पोस्ट करण्यात आला. यामध्ये, 'सरकारी अधिकाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळालेलं नसताना सरकार आणखी किती काळ त्यांच्याकडून गप्प राहण्याची अपेक्षा करतं,' असा सवाल पंतप्रधान इम्रान खान यांना विचारण्यात आला आहे. पगार न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करण्याव्यतिरिक्त, इम्रान खान यांच्यावर जोरदार टीका करणारं आणखी एक ट्विट म्युझिक व्हिडिओसह पोस्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, हे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचा दावा प्रवक्त्यांकडून करण्यात आला आहे.
पाकिस्तान सरकारच्या तिजोरीत सरकारी अधिकाऱ्यांना वेतन देण्यासाठीदेखील पैसे नाहीत. अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचे (Government Employees) दोन-तीन महिन्यांपासून पगार (salary) झालेले नाहीत. याबद्दल आतापर्यंत दबक्या आवाजात आपलं दुःख व्यक्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आता आपलं दुःख जगजाहीर केलं असून, इम्रान खान यांना सवाल केला आहे. त्यामुळं आपलं पद टिकवण्यासाठी आटापिटा करणाऱ्या इम्रान खान यांच्या संकटात आणखी भर पडली असून, सरकारी अधिकाऱ्यांच्या बंडखोरीचा सामना करण्याची वेळ आली असल्याची चर्चा सुरू आहे.
रेखा बरोबर मी खूप Enjoy केले आणि... इम्रान खान यांनीच सांगितला होता
'महागाईचे (Inflation) मागचे सर्व विक्रम मोडीत काढत असताना, आपण किती काळ अपेक्षा करता, की आम्ही सरकारी अधिकारी गप्प बसू. गेल्या 3 महिन्यांपासून पगार न देता तुमच्यासाठी काम करत राहू. फी न भरल्यामुळे आमच्या मुलांना शाळेतून बाहेर काढण्यात आलं आहे. हाच #नवा पाकिस्तान आहे का?' असं या ट्विटमध्ये लिहिलं आहे. याबरोबरच आणखी एक ट्विट करण्यात आले असून, त्यात लिहिलं आहे, की 'आम्हाला माफ करा. आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही.' याबरोबर इम्रान खान यांचा फोटो लावून त्यावर 'आप ने घबराना नहीं' असे लिहिण्यात आलं असून, सोबत एक म्युझिक व्हिडिओही आहे.
'आप ने घबराना नही है' हे इम्रान खान यांचं विधान सध्या पाकिस्तानमध्ये त्यांच्या चेष्टेचं, उपहासाचं कारण बनलं आहे. त्याचाच वापर करून गायक कलाकार साद अल्वी यांनी आपल्या एका म्युझिक अल्बममध्ये 'आप ने घबराना नहीं' हे शीर्षक असलेलं एक गाणं तयार केलं होतं. 8 मार्च रोजी हा म्युझिक व्हिडिओ अल्बम प्रदर्शित झाला होता. या गाण्याचा वापर करून दुसऱ्या ट्विटमध्ये इम्रान खान यांच्याबद्दलचा रोष व्यक्त करण्यात आला आहे. 'साबण महाग झाला तर वापरू नका. गहू महाग झाला तर खाऊ नका,' असे या गाण्याचे बोल आहेत. त्यामुळे ही पोस्ट आणि व्हिडिओ अवघ्या काही मिनिटांतच व्हायरल झाला. हे ट्विटर खातं अधिकृत असून, त्याचे 1,553 फॉलोअर्स आहेत.
इम्रान खान यांनी राजकारण सोडून क्रिकेटमध्ये परतावे, सिंधचे CM..
यामुळे सर्वत्र खळबळ माजल्यानंतर इम्रान खान यांचे प्रवक्ते डॉ. अर्सलान खालिद यांनी ट्विट केलं आणि सांगितलं, की, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दूतावासाचं हे खातं हॅक झाले आहे. दीड तासानंतर ते ट्विट डिलीट करण्यात आलं. परराष्ट्र मंत्रालय या प्रकरणाची चौकशी करत आहे, असं ट्विट डॉ. खालिद यांनी केलं आहे.
डॉन या पाकिस्तानी माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, अर्सलान खालिद यांच्या ट्विटव्यतिरिक्त परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या घटनेबाबत कोणतंही निवेदन जारी केलेलं नाही.
कोरोनाची परिस्थिती नीट न हाताळल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर केला जात आहे. आर्थिक अफरातफरी प्रकरणातले आरोपी आणि फरार होऊन लंडनमध्ये वास्तव्यास असलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaj Sharif) यांना देशात परत बोलावण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशाची आर्थिक स्थिती (Financial Condition) डबघाईला आल्याने महागाई प्रचंड वाढली आहे. परदेशी कर्जाचा भार वाढत आहे, उत्पन्न घटलं आहे. यामुळे इम्रान खान यांच्याविरोधात जनमत प्रतिकूल झालं आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार महागाई 9.2 टक्क्यांवरून वाढून 11.5 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. ऑक्टोबरमध्ये इंधनाच्या किमतीत झालेल्या विक्रमी वाढीमुळे गेल्या 20 महिन्यांतली सर्वाधिक वाढ नोंदवली गेली असल्याचं वृत्त डॉन या तिथल्या प्रमुख वृत्तपत्राने दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Imran khan, Pak pm Imran Khan, Pakistan