ShiaGenocide पाकिस्तानात शियांविरोधात असंतोष भडकला! कराचीत धडकी भरवणारा मोर्चा

ShiaGenocide पाकिस्तानात शियांविरोधात असंतोष भडकला! कराचीत धडकी भरवणारा मोर्चा

कराचीतल्या शुक्रवारच्या मोर्चाची दृश्य हादरवून टाकणारी आहेत. सोशल मीडियावर पुन्हा #ShiaGenocide ट्रेंड होऊ लागलं आहे. पाकिस्तानात शियांविरोधात हिंसाचार पेटणार का, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

कराची, 12 सप्टेंबर : शिया मुस्लिमांच्या विरोधात निदर्शनं करणारा प्रचंड मोठा मोर्चा शुक्रवारी पाकिस्तानच्या कराची शहरात निघाला. हजारोंच्या संख्येने उपस्थित इस्लामधर्मीय शिया पंथीय मुस्लिमांच्या विरोधात घोषणा देत होते. या मोर्चाची दृश्य हादरवून टाकणारी आहेत. पुन्हा एकदा पाकिस्तानात शियांविरोधात हिंसाचार पेटणार का, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तानातल्या सोशल मीडियावर काल आणि आजसुद्धा दिवसभर #ShiaGenocide चीच चर्चा आहे. सिपाह-ए साहबा पाकिस्तान नावाचे बॅनर्स घेऊन हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते. शिया काफिर आहेत, या अर्थाच्या घोषणा दुमदुमत होत्या. सिपाह ए साहबा पाकिस्तान ही दहशतवादी संघटना आहे आणि या शियांची निर्घृण हत्या करण्यासाठी ही ओळखली जाते.

गेल्या महिन्यात झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमात काही शिया नेत्यांनी इस्लामविरोधात भाष्य केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे शियांविरुद्ध पुन्हा एकदा पाकिस्तानात असंतोष उफाळला असल्याचं तिथल्या माध्यमांनी म्हटलं आहे.

मोहर्रमच्या महिन्याच्या सुरुवातीलाच या दोन इस्लाम पंथीयांमध्ये तेढ निर्माण झाली. तेव्हापासूनच शिया विरुद्ध सुन्नी असे वाद सुरू आहेत.

शियांविरोधात धर्मयुद्ध भडकू शकतं, अशी परिस्थिती निर्माण होण्यामागे पंतप्रधान इम्रान खान यांची निष्क्रियता असल्याचं काही पाकिस्तानी माध्यमांनी म्हटल्याचं वृत्त ANI ने दिलं आहे. आफ्रिन नावाच्या कार्यकर्तीने इम्रान खान यांच्यावर आरोप करणारं Tweet केलं आहे. "शियांविरोधातली भडकावणारी वक्तव्य गंभीरपणे घेण्यात येत नाहीत. केवळ आम्ही ठराविक पंथाचे अनुयायी आहोत म्हणून आमच्या बांधवांवर हल्ले होत आहेत. शियांविरोधा बोलणाऱ्यांना सरकार पाठिशी घालत आहे", असा आरोप या कार्यकर्तीने सोशल मीडियावर केला आहे.

मोहर्रमच्या महिन्यात अशुरा या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आणि धर्मग्रंथाचं वाचन केल्याबद्दल लक्ष्य केलं जात आहे. शिया- सुन्नी वाद जुना असला, तरी गेल्या महिन्यापासून शियांविरोधात गरळ ओकणाऱ्या वक्तव्यांनी पाकिस्तानात कहर केला आहे. याचीच परिणती शुक्रवारच्या कराचीत निघालेल्या भव्य मोर्चाच्या रूपाने दिसली.

शियांविरोधातल्या हिंसाचाराच्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांना अटक करण्यात आली आहे. बिलाल फारुकी नावाच्या पत्रकाराला अकारण बेड्या ठोकण्यात आल्या. शियांचा नरसंहार होणार असल्याच्या विरोधात फारुकी बोलत होते.

पाकिस्तानात ईश्वरनिंदा हा सर्वांत मोठा गुन्हा मानला जातो. पाक कायद्यानुसार या गुन्ह्याबद्दल देहांताची शिक्षा दिली जाते. आताचा शियांविरोधातला असंतोष धर्मभावना भडकावणारा असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे पाकिस्तानात आधीच अल्पसंख्य असलेले शिया पंथीय प्रचंड हादरले आहेत.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 12, 2020, 5:23 PM IST

ताज्या बातम्या