अमेरिकेतील अंतरराळ संशोधन संस्था नासाच्या (NASA) वैज्ञानिकांच्या संशोधनाला मोठे यश मिळाले आहे. नासाच्या वैज्ञानिकांना अंतराळात मुळा (Radish) उगवण्यात यश आले आहे. नासाने याबाबतचा फोटो ट्विट करत ही माहिती सर्वांशी शेअर केली आहे.
ह्यूस्टन, 6 डिसेंबर : अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था नासाच्या (NASA) वैज्ञानिकांच्या संशोधनाला मोठे यश मिळाले आहे. नासाच्या वैज्ञानिकांना अंतराळात मुळा (Radish) उगवण्यात यश आले आहे. मानव दीर्घकाळ अंतराळात किंवा परग्रहावर कसा जगू शकेल याबाबत सतत संशोधन सुरु असते. अंतराळात दीर्घकाळ जगण्यासाठी खाद्यपदार्थ पिकवण्याची कोणतीही सोय यापूर्वी उपलब्ध नव्हती. त्या पार्श्वभूमीवर नासाच्या संशोधकांना मुळाचे उत्पादन आलेले यश महत्वाचे मानले जात आहे.
नासाचे अंतराळवीर आणि फ्लाईट इंजिनियर केट रुबिन्स यांनी या मुळाच्या पिकाची कापणी केली आहे. आता हा मुळा कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात येणार असून 2021 मध्ये पृथ्वीवर आणण्यात येईल. नासाने या संपूर्ण प्रयोगाला प्लांट हॅबिटेट 02 (Plant Habitat-02) हे नाव दिले आहे. नासाने याबबात ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
Space harvest complete! 👩🌾👩🚀
Astronauts on the @Space_Station have collected the first ever radishes grown in space. The vegetables will be safely stored and sent back to Earth for study.
नासानी अंतराळात मुळा पिकवण्याचे कारणही शास्त्रीय आहे. मुळ्याची भाजी ही पौष्टिक असते आणि ती लवकर पिकते. वैज्ञानिकांना लवकर पिकणारी भाजी तयार करायची होती त्यामुळे त्यांनी मुळा निवडला. ही भाजी 27 दिवसांमध्ये तयार होईल आणि खाण्यास पौष्टिक असेल असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे.
मुळा ज्या स्पेस चेंबरमध्ये उगवण्यात आला तिथे लाल, निळा, हिरवा आणि पांढऱ्या रंगातील एलईडी लाईटचा प्रकाश सोडण्यात आला होता. त्यामुळे रोपांची चांगल्या प्रकारे वाढ होण्यास मदत झाली. अंतरराळात पिकवलेल्या या मुळ्याची सर्वप्रथम फ्लोरिडामधील केनडी स्पेस सेंटरमध्ये तयार करण्यात आलेल्या मुळ्याशी तुलना करण्यात येणार आहे. त्यानंतर पृथ्वीवर लागवड करण्यात येणाऱ्या मुळ्याशी देखील याची तुलना करण्यात येईल.
यापूर्वी अंतरराळवीरांनी पानं असणारी रोपं पिकवली आहेत. त्यानंतर आता पहिल्यांदाच एखाद्या भाजी पिकवण्यात त्यांना यश आले आहे.