Home /News /videsh /

Russia Ukraine War: बंकरमध्ये लपल्या आहेत युक्रेनमधील सरोगेट माता, सततच्या बॉम्ब हल्ल्यांमुळे जीव धोक्यात

Russia Ukraine War: बंकरमध्ये लपल्या आहेत युक्रेनमधील सरोगेट माता, सततच्या बॉम्ब हल्ल्यांमुळे जीव धोक्यात

युक्रेन हे जगातील सर्वात मोठे सरोगसी हब मानले जाते. अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत अनेक जोडपी सरोगेट बाळासाठी युक्रेनकडे वळतात; पण युक्रेनचे रशियाशी युद्ध सुरू झाल्यापासून इथल्या सरोगसी उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे.

कीव्ह, 05 मार्च: युद्धाचे (Russia Ukraine War) परिणाम त्या देशाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय सर्वच व्यवस्थांवर होतात. सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित राहणं, स्वतःचा जीव वाचवणं कठीण होतं. सध्या युक्रेनमधील जनतेला युद्धाच्या अशा भीषण परिणामांना सामोरं जावं लागत आहे. रशियन सैन्याची कारवाई तीव्र झाल्यानं युक्रेनमधील अनेक शहरं उद्ध्वस्त झाली असून, इथल्या नागरिकांना जीवाच्या भीतीनं घरदार सोडावं लागत आहे. अशा परिस्थितीत इथं सरोगेट मदर्सच्या (Surrogate Mothers) सुरक्षेचा प्रश्न तसंच एकूणच या उद्योगाच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. युक्रेन हे जगातील सर्वात मोठे सरोगसी हब मानले जाते. अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत अनेक जोडपी सरोगेट बाळासाठी युक्रेनकडे वळतात; पण युक्रेनचे रशियाशी युद्ध सुरू झाल्यापासून इथल्या सरोगसी उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. युक्रेनमध्ये लाखो सरोगेट माता असून, सध्या त्यांचा जीव धोक्यात आहे. त्यांना या युद्धकाळात विशेष संरक्षणाची गरज आहे. या संदर्भात युक्रेनची सर्वात मोठी सरोगेट प्रोव्हायडर कंपनी बायोटेक्सकॉमने सांगितलं की, या कठीण काळात कंपनीने अनेक सेफ्टी बंकर तयार केले असून, त्या बंकरमध्ये सुमारे 200 सरोगेट मातांना ठेवता येईल, अशी सोय करण्यात आली आहे. आज तकने याविषयी वृत्त दिले आहे. हे वाचा-युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी देश सोडला?, समोर आलं सत्य ज्या जोडप्यांनी सरोगेट माता निवडल्या आहेत. त्यांनीही परिस्थिती बिघडण्याआधीच सरोगेट मदर्सना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र युद्धकाळात सरोगेट मातांबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. नियम नाहीत. त्यामुळे युद्धस्थितीत एखाद्या सरोगेट मदरने युद्धादरम्यान आपला देश सोडण्यास नकार दिला तर अशा परिस्थितीत ते जोडपं काय करणार? असे प्रश्न उभे राहिले आहेत. युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू झाल्यापासून हा प्रश्न चर्चेत आला असून, याबाबत अनेक कायदेतज्ज्ञांकडूनही मदत घेतली जात आहे. या प्रश्नांवर कोणाकडेही कायमस्वरूपी उपाय नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र युक्रेनमध्ये Growing Families सारखे सेवा प्रदाते निश्चितपणे अशा जोडप्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक सेवा प्रदाता स्पष्टपणे सांगत आहे की कोणत्याही सरोगेट आईला वॉरझोनमधून बाहेर काढणं सोपं नाही. त्यांच्या मते, कीव्हसारख्या ठिकाणी सरोगेट मदर अडकली असेल, तर तिथे युद्धबंदी लागू होईपर्यंत तिची सुटका होऊ शकत नाही. हे वाचा-युक्रेनमध्ये शॉपिंग सेंटर लुटताना दिसले सामान्य नागरिक, दृश्य कॅमेऱ्यात कैद सरोगसी उद्योगातील आघाडीची कंपनी बायोटेक्सकॉमदेखील (BioTexCom) ही समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेत आहे. सरोगेट मदर्स आणि ही सेवा घेणाऱ्या जोडप्यांना त्यांनी शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. तुमचा निर्णय आणि वर्तन यावरच तुमच्या बाळाचं आयुष्य अवलंबून आहे, असं या कंपनीनं म्हटलं आहे. युक्रेनमध्ये सरोगसी उद्योग खूप फायदेशीर मानला जातो. हा व्यवसाय इथं मोठ्या प्रमाणात चालतो. 2018 मध्ये, अल जझिरामध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, युक्रेनमध्ये दरवर्षी 2,000 ते 2,500 बाळांचा जन्म फक्त सरोगसीद्वारे होतो. इथे सरोगसी खूप स्वस्त आहे. संपूर्ण प्रक्रिया 30 ते 50 हजार डॉलर्समध्ये केली जाते, तर अमेरिकेत यासाठी याच्या अनेकपट पैसे मोजावे लागतात. मात्र आता युद्धामुळे सरोगेट मदर्सची सुरक्षितता हे मोठं आव्हान ठरलं आहे. युक्रेनमधील अनेक दवाखाने 'बेबी फॅक्टरी' बनले असल्याचा दावाही केला जातो. इथल्या StopSurrogacyNow सारख्या संस्था त्याविरोधात आवाजदेखील उठवत आहेत. युद्धाची परिस्थिती नसतानाही युक्रेनमध्ये अनेक ठिकाणी सरोगेट मातांना प्राण्यासारखी वागणूक दिली जात होती. हॉस्पिटलमध्येही त्यांची योग्य काळजी घेतली जात नव्हती, असा दावा या संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे. एखादं मूल अपंग जन्मालं किंवा जन्मजात त्याला काही आजार असल्याचं आढळलं तर अनेक वेळा त्या सरोगेट मदरला पैसेही दिले जात नाहीत. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत तर सरोगेट मदर्सचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.
First published:

Tags: Russia, Russia Ukraine, Russia's Putin, Ukraine news

पुढील बातम्या