कीव्ह : रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्ध (
Russia Ukraine War) सुरु होऊन 13 दिवस झाले आहेत. रशियन सैन्य युक्रेनमधल्या निवासी भागात (
Residential Areas) हल्ले करत आहे. रशियाच्या सातत्यपूर्ण हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. राजधानी कीव्ह (
Kyiv) काबीज करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बॉम्ब हल्ले केले जात आहेत. दरम्यान, युक्रेनच्या अनेक नागरिकांनी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी बंदुका हाती घेतल्या असून, ते युद्धभूमीत उतरले आहेत. देशासाठी प्राणपणाला लावण्याची भावना वृद्ध नागरिकांमध्येही दिसून येत आहे. तथापि, संयुक्त राष्ट्र संघाच्या म्हणण्यानुसार, युद्ध सुरू झाल्यापासून पाच लाखांहून अधिक नागरिकांनी युक्रेन सोडलं आहे. यामध्ये चोमोनिन (Chomonin) गावातील 80 वर्षीय आजी पिरोस्का बक्सा यांचाही समावेश आहे. या आजीबाई युद्धाच्या स्थितीतून बचाव करण्यासाठी सुमारे सात तास चालत होत्या.
पिरोस्का बक्सा यांचा जन्म 1942 मध्ये झाला. या वृद्ध महिलेनं आपली मुलगी आणि 14 वर्षांच्या नातीसोबत हंगेरीची सीमा (Hungary Border) ओलांडली. सुरुवातीला या आजीबाई आपला देश, आपलं घर सोडण्यास तयार नव्हत्या. मात्र, कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी होकार दिला.
रशियन विमानांनी युक्रेनमधील निवासी भागांवर टाकले बॉम्ब; चिमुकल्यांचाही मृत्यू, हृदयद्रावक VIDEO
याबाबत पिरोस्का बक्सा यांनी सांगितलं की, ''कोणत्याही परिस्थितीत देश सोडून बाहेर पडू नये, असं मला वाटत होतं. आपलं घर, तसंच सर्वकाही सोडून जाणं, ही खूप दुःखद आणि वेदनादायी भावना आहे. माझ्या मुलीकडे एक कुत्रा आहे. पण आम्हाला त्यालाही सोडून द्यावं लागलं. आता त्याच्यासोबत कोणीही नाही. प्रत्येक जण आपलं घरदार सोडून जीव वाचवण्यासाठी धावत आहे,'' असं बक्सा यांनी सांगितलं.
एका वृत्तानुसार, आतापर्यंत 70 हजारांहून अधिक शरणार्थी (Refugees) शेजारच्या हंगेरी देशात दाखल झाले आहेत. युक्रेन सरकारने नागरिकांना दुसऱ्या देशात जाता यावं, यासाठी आपली सीमा खुली ठेवाण्याचं वचन दिलं आहे.
Russia-Ukraine War: '...तर क्षणात युद्ध थांबवणार'; रशियाने युक्रेनपुढे ठेवल्या या 4 अटी
बक्सा यांच्या नातीनं सांगितलं की, ``रशियन सैन्यानं हल्ले आणखी तीव्र केले आहेत. अन्न आणि जीवनावश्यक वस्तू मिळवताना आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पलायन करणं हाच जीव वाचवण्याचा एकमेव मार्ग होता. देश सोडून जायला आजीचा नकार होता, पण तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळे तिनं सोबत येण्यास होकार दिला.``
''आम्ही युक्रेनियन निर्वासितांची काळजी घेण्यास तयार आहोत. आम्ही हे आव्हान जलद आणि कार्यक्षमतेनं पेलण्यास सक्षम होऊ,'' असं हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन (Victor Urban) यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.