कीव 08 मार्च : मागील काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन
(Russia-Ukraine War) यांच्यात विनाशकारी युद्ध सुरू आहे. रशिया युक्रेनशी वाटाघाटी करण्यास तयार आहे, परंतु यासाठी त्यांनी काही अटी ठेवल्या आहेत. क्रेमलिनच्या
(Kremlin) प्रवक्त्याने सोमवारी सांगितलं की, रशियाने युक्रेनला सांगितलं आहे की कीवने अटींची यादी स्वीकारल्यास ते क्षणात आपले लष्करी ऑपरेशन थांबवण्यास तयार आहेत. हे रशियाचं आतापर्यंतचं सर्वात स्पष्ट विधान आहे. युक्रेनमधील तथाकथित 'स्पेशल मिलिटरी ऑपरेशन' थांबवण्यासाठी रशियाने काही अटी ठेवल्या आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला 12 दिवस झाले असून आतापर्यंत दोन्ही बाजूंचं मोठं नुकसान झालं आहे.
दोन्ही देशांमधील युद्धामुळे आतापर्यंत लाखो लोकांनी देश सोडला आहे. युनायटेड नेशन्स निर्वासित एजन्सीनं म्हटलं आहे की आतापर्यंत 1.7 दशलक्षाहून अधिक लोकांनी युद्धग्रस्त युक्रेन सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. संयुक्त राष्ट्र निर्वासितांसाठीच्या उच्चायुक्तांनी सोमवारी सांगितलं की 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर रशियन आक्रमण सुरू झाल्यापासून 1.7 दशलक्षाहून अधिक लोकांनी युक्रेनमधून पलायन केलं आहे आणि इतर देशांमध्ये आश्रय घेतला आहे. यापैकी सुमारे दहा लाख लोकांनी पोलंडमध्ये आश्रय घेतला आहे. त्याचवेळी, 1,80,000 हून अधिक लोकांनी हंगेरीमध्ये आश्रय घेतला आहे तर 1,28,000 लोकांनी स्लोव्हाकियामध्ये आश्रय घेतला आहे.
रशियाने ठेवलेल्या चार अटी -
युक्रेनने लष्करी कारवाई थांबवावी: क्रेमलिनचे प्रवक्ते म्हणाले, 'आम्ही खरोखरच युक्रेनचे निशस्त्रीकरण संपवत आहोत. आम्ही ते संपवू. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे युक्रेननेही आपली लष्करी कारवाई थांबवली पाहिजे. त्यांनी त्यांची लष्करी कारवाई थांबवावी आणि मग कोणीही गोळीबार करणार नाही.
तटस्थता प्रस्थापित करण्यासाठी युक्रेनने आपलं संविधान बदललं पाहिजे: प्रवक्त्याने सांगितलं, 'युक्रेनने घटनेत दुरुस्ती करावी, त्यानुसार युक्रेन कोणत्याही गटात सामील होण्याचा कोणताही हेतू ठेवणार नाही असं ठरवावं.' रशियाला असं वाटतं की युक्रेनने नाटो किंवा युरोपियन युनियनसारख्या संघटनांमध्ये सामील होऊ नये.
क्रिमियाला रशियाचा भाग मानावा: रशियाने म्हटलं आहे की युक्रेनला क्रिमिया द्वीपकल्प रशियाचा भाग म्हणून स्वीकारावा लागेल. क्रेमलिनच्या प्रवक्त्याने सांगितलं की, "आम्ही याबद्दलही बातचीत केली आहे की युक्रेनने क्रिमियाचा रशियन प्रदेश म्हणून स्वीकार करावा." रशियाने 2014 मध्ये क्रिमियावर कब्जा केला होता.
युक्रेनने दोनेस्तक आणि लुहान्स्कला स्वतंत्र देश मानावं: क्रेमलिनचे प्रवक्ते म्हणाले, 'दोनेस्तक आणि लुहान्स्क स्वतंत्र देश आहेत हे त्यांनी मान्य करायला हवं आणि यानंतर एकाच क्षणात युद्ध थांबेल" युक्रेनविरुद्ध युद्ध करण्यापूर्वी रशियाने या दोन प्रदेशांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.