#RoyalWedding : प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या शाही विवाहाची लगीनघाई

#RoyalWedding : प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या शाही विवाहाची लगीनघाई

या शाही विवाहामुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे.

  • Share this:

ब्रिटन, 19 मे : ब्रिटनचे राजपूत्र प्रिन्स हॅरी आणि हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्कल यांचा आज शाही विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडणार आहे. या शाही विवाहामुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे.

या शाही सोहळ्यासाठी एक लाखांहून अधिक लोक विंडसर कासलमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. या शाही विवाहसोहळ्याला बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला विशेष निमंत्रण देण्यात आले असून प्रसिद्ध टेनिसपटू सेरेना विल्यम्सही या विवाहसोहळ्याला हजेरी लावणार आहे.

 सासरे प्रिन्स चार्ल्स मेगनला घेऊन जाणार विवाह सोहळ्यात

मेगन मार्कल आणि आई डोरिया रॅगलंड यांचं काल बर्कशायरमध्ये आगमन झालं. तिथल्या क्लाईव्हडेन हॉटेलमध्ये त्या दोघी उतरल्या आहेत. गेल्या आठवड्यात मेगनच्या आईनं राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांची भेट घेतली. विवाह सोहळ्यात मेगनचे सासरे प्रिन्स चार्ल्स तिला विवाह ठिकाणी घेऊन येतील. खरंतर हा मान मुलीच्या वडिलांचा असतो. पण मेगनच्या वडिलांची प्रकृती ठीक नसल्यानं ते उपस्थित राहू शकणार नाहीयेत.

रॉयल वॉचर्स पोहोचले

शाही विवाह सोहळा बाहेरून का होईना, अनुभवण्यासाठी हजारो लोक विंडसर कॅसलबाहेर जमा झालेत. त्यांनी तिथे मुक्कामच केलाय. यांना रॉयल वॉचर्स असंही म्हटलं जातं. म्हणजे राजघराण्यात काय चालंलय, याची बित्तंबातमी ठेवणारे, त्याबद्दल भरपूर वाचन करणारे हे लोक. राजघराण्याच्या सर्व समारंभांना हे उपस्थित असतात. हे मूळचे ब्रिटनचे नागरिक.. स्वखर्चानं ते विविध ठिकाणी जाऊन ते कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात.

प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स विल्यम लोकांच्या भेटीला

हजार लोक बाहेर जमलेले असताना प्रिन्स हॅरीनं त्यांना मोठं सरप्राईझ दिलं. प्रिन्स हॅरी आणि त्याचा भाऊ प्रिन्स विल्यम काल लोकांची भेट घ्यायला विंडसर कॅसलच्या बाहेर आले. त्यांनी तिथे असलेल्या लोकांशी हस्तांदोलन केलं. त्यांची विचारपूस केली, आणि इतक्या लांबून आल्यानिमित्त त्यांचे आभार मानले. कित्येक तासांच्या प्रतीक्षेचं फळ मिळालं, अशी भावना अनेक चाहत्यांमध्ये होती.

विंडसर कॅसलचं महत्त्व

हा शाही विवाह सोहळा जिथे पार पडतोय, त्या विंडसर कॅसलला अनन्यसाधारण असं ऐतिहासिक महत्व आहे. गेली एक हजार वर्षं हा सुंदर किल्ला भूमीत पाय रोवून उभा आहे. विल्यम द काँकररनं एक हजार 66 सालानंतर हा किल्ला बांधायला घेतला. तेव्हापासून तो इतिहासाचा साक्षीदार आहे. तेरा एकर भूभागावर असलेला हा विंडसर कॅसल म्हणजे भव्य महाल, तटबंदी, इतर छोट्या इमारती आणि एक छोटेखानी शहर, असा त्याचा पसारा आहे. बॅगशॉट हीथ प्रकारचा दगड याच्या बांधकामासाठी वापरण्यात आला होता. विशेष ब्रिटीश परंपरेनुसार त्याचं संवर्धन इतकं व्यवस्थित केलं गेलंय की आज दहा शतकांनंतरही विंडसर कॅसल दिमाखात उभा आहे.

First published: May 19, 2018, 12:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading