मुंबई, 10 जानेवारी : संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या कोरोना व्हायरसवर (Corona Virus) लस शोधण्यासाठीच 2020 हे संपूर्ण वर्ष उलटलं. 2021 मध्ये ही लस उपलब्ध होताच सर्वच देशांनी ती मिळवण्याचा खटोटोप सुरु केला आहे. भारताकडे अनेक देशांनी ही लस मिळावी म्हणून मागणी केली आहे. भारताने यापैकी अनेक देशांमध्ये ही मदत रवाना देखील केली आहे. त्याचवेळी या विषयावर अप्रचारही तितकाच मोठ्या प्रमाणात सुरू आहे. इराणचे मौलवी आयातुल्लाह अब्बास तबरीजियन (Iranian Maulvi Ayatollah Abbas) देखील आता हा अप्रचार करणाऱ्या मंडळींमध्ये सहभागी झाले आहेत. कोरोना लस (Corona Vaccine) घेतल्यानंतर लोकं समलिंगी होतील असा हास्यास्पद दावा त्यांनी केला आहे.
जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना लस अधिक परिणामकारक कशी होईल यासाठी दिवस-रात्र एक करुन प्रयोगशाळेत संशोधन करत आहेत. त्याचवेळी आयातुल्लाह सारखी काही मंडळी याबाबत संभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहेत. आयातुल्लाह यांनी टेलिग्राम (Telegram) अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करत हा दावा केला आहे. त्यांचे सोशल मीडियावर (Social Media) दोन लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. इराणमध्ये समलैंगिकता हा गुन्हा आहे. एखादा व्यक्ती या प्रकारच्या संबंधांमध्ये सापडला तर त्याच्यावर कठोर शिक्षा करण्याची तरतूद आहे. त्या पार्श्वभूमीवर इराणच्या मौलवीनं केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.
LGBT संघटनांकडून नाराजी
LGBT समुदायाच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी आयातुल्लाह यांच्या या दाव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. हा दावा म्हणजे समलिंगी व्यक्तींना ‘सैतान’ ठरवण्याची चाल आहे, असा दावा या संघटनेचे कार्यकर्ते पीटर टुटशेल यांनी केला आहे.
दरम्यान, इराणी प्रशासनातील अन्य मौलवींप्रमाणे अयातुल्लाह यांनी कोरोनाचा संबंध देखील लैंगिकतेशी जोडल्याचा दावा इराण सोडणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या शीना वोजूदी यांनी केला आहे. या मौलवींमध्ये मानवता आणि ज्ञानाचा अभाव असल्याची टीका त्यांनी केली आहे. इतकंच नाही, तर इराणमधील अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी लस घेतली असून सामान्य नागरिकांना ती दिली जात नसल्याचा आरोप वोजूदी यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.