वॉशिंग्टन, 31 ऑक्टोबर : अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या एका मोठ्या कारवाईची बातमी दिली. शनिवारी संध्याकाळी ट्रम्प यांनी एक Tweet करून अमेरिकन सैन्याचा मोठा विजय अशा अर्थाचं ट्वीट केलं. अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसची कारवाई आणि लवकरच सविस्तर माहिती सांगतो, असं म्हटल्याने अमेरिकेची कुठली कारवाई यावर अनेक शक्यता वर्तवल्या गेल्या. पण रॉयटर्सने पेंटागॉनच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार नायजेरियात जाऊन अमेरिकेच्या सैन्याने ही कारवाई केली आहे.
Big win for our very elite U.S. Special Forces today. Details to follow!
अमेरिकेच्या स्पेशल फोर्सला एका मोठ्या कामगिरीत यश आलं आहे, असा Tweet त्यांनी केल्यानंतर अनेक शक्यता वर्तवल्या गेल्या. उत्तर नायजेरियामध्ये काही लोकांना तिथल्या काही स्थानिकांनी अपहरण करून ओलीस ठेवलं होतं. यामध्ये 27 वर्षीय अमेरिकन नागरिकाचा समावेश होता. अमेरिकेच्या विशेष सैन्याने धडक कारवाई करत या नागरिकाची सुटका केली. पेंटागॉनने या वृत्ताला दुजोरा दिला आहे, पण अधिक माहिती दिलेली नाही.
अमेरिकन सैन्यदलाच्या नेवी सीलसह गेलेल्या एका तुकडीने 27 वर्षांच्या फिलीप वॉल्टन या नागरिकाची सुटका केली, अशी माहिती दोन अमेरिकन अधिकाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितली. या सैनिकी कारवाईत अमेरिकन सैन्याचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. कुणीही जखमी झालेलं नाही.
अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच ट्रम्प यांंचं ट्वीट आल्याने अनेक शक्यता वर्तवण्यात येत होत्या. अजूनही याविषयी अधिकृत माहिती आलेली नाही.