Home /News /videsh /

'माझं बाळ गेलं, मलाही मारा'; बॉम्ब हल्ल्यात गंभीर जखमी गर्भवती महिलेचा टाहो, युद्धादरम्यानच सगळ्यात वेदनादायी दृश्य

'माझं बाळ गेलं, मलाही मारा'; बॉम्ब हल्ल्यात गंभीर जखमी गर्भवती महिलेचा टाहो, युद्धादरम्यानच सगळ्यात वेदनादायी दृश्य

Ukraine-Russia War : महिलेवर ताबडतोब शस्त्रक्रिया केल्याची माहिती सर्जन तिमूर मारिन यांनी दिली; मात्र बॉम्ब हल्ल्याच्या जखमा आणि पोटातल्या बाळाचा मृत्यू हे दोन्ही ती सहन करू शकली नाही

कीव 15 मार्च : युद्धाचे (War) परिणाम अत्यंत वेदनादायी असतात. निरपराध नागरिक, महिला, निष्पाप मुलं यात जास्त भरडली जातात. युक्रेन-रशिया युद्धातही (Ukraine-Russia War) हेच दिसून आलं. या युद्धादरम्यानचा युक्रेनमधला अंगावर काटा आणणारा एक फोटो जगभरात व्हायरल (War Photo Viral) झाला होता. हा फोटो म्हणजे निष्पापांवर होणाऱ्या अत्याचारांचा कळस आहे, अशी प्रतिक्रिया जगभरातून व्यक्त करण्यात आली होती. या फोटोबद्दल अधिक माहिती देणारं वृत्त दैनिक भास्करमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे. रशिया-युक्रेनमधल्या 19 दिवसांच्या युद्धातला हा सर्वांत निर्दयी क्षण म्हटला पाहिजे. युक्रेनमधली एक गर्भवती महिला रशियानं केलेल्या बॉम्बहल्ल्यात गंभीररीत्या जखमी (Pregnant Woman Injured) झाली. या महिलेच्या कमरेखालचा सगळा भाग रक्ताने माखलेला होता, असं डॉक्टरांनी सांगितलं. या हल्ल्यात तिच्या पोटातल्या बाळाचा जीव गेला. हे या महिलेला कळल्यावर साहजिकच तिचं दु:ख अनावर झालं. ‘माझं बाळ राहिलं नाही, आता मलाही मारून टाका,’ असं ती डॉक्टरांना कळवळून सांगत होती. डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला; पण बाळ गेल्यानंतर अर्ध्या तासातच या महिलेनंही आपला शेवटचा श्वास घेतला. स्ट्रेचरवर रक्ताने माखलेल्या या महिलेचा हा फोटो जगभरात व्हायरल झाला होता. असोसिएटेड प्रेसच्या (Associated Press) पत्रकारांनी या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो टिपले होते.

रशियाचं सकारात्मक पाऊल? झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्यासमोर ठेवला 'तो' प्रस्ताव

हा क्षण टिपण्यात आला तेव्हा या महिलेला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेलं जात होतं. तिच्यावर ताबडतोब शस्त्रक्रिया केल्याची माहिती सर्जन तिमूर मारिन यांनी दिली; मात्र बॉम्ब हल्ल्याच्या जखमा आणि पोटातल्या बाळाचा मृत्यू हे दोन्ही ती सहन करू शकली नाही. या गर्भवती महिलेचा जीव वाचवणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. त्यामुळे त्या गडबडीत तिला तिच्या पतीचं नाव विचारायचंही डॉक्टरांच्या लक्षात आलं नाही. काही वेळानं तिचे वडील येऊन तिचा मृतदेह घेऊन गेले. 'या महिलेचा मृतदेह कोणी तरी घेऊन गेलं हे तरी नशीब. नाही तर तिलाही निनावी कबरींमध्येच अंतिम विश्रांती घ्यावी लागली असती,' अशी प्रतिक्रिया डॉ. मारिन यांनी दिली. युक्रेनमधल्या मारियुपोलमध्ये (Mariopoal) रशियानं केलेला भीषण गोळीबार, बॉम्बहल्ल्यांमध्ये कित्येक निरपराध नागरिक मारले गेले आहेत. त्यांची ओळखही पटू शकलेली नाही. सध्या या सगळ्यांचं सामूहिक दफन केलं जात आहे. जगभरात या हल्ल्याच्या बातम्या दाखवल्या जात होत्या. रशियावर युद्ध अपराध (War Crimes) म्हणजेच युद्धाच्या नियमांचा भंग केल्याचा आरोप केला जात होता; मात्र रशियाच्या अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले. ज्या हॉस्पिटलवर हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे ते हॉस्पिटल युक्रेनमधले अतिरेकी लपण्यासाठी वापरत होते आणि तिथे कोणी रुग्ण किंवा वैद्यकीय कर्मचारी नव्हते असा दावा रशियातर्फे करण्यात आला. संयुक्त राष्ट्रांमधल्या (UN) रशियाच्या दूतावासातल्या राजदूतांनी संबंधित फोटो बनावट असल्याचा दावा केला आहे.

युक्रेनकडून रशियाविरुद्ध रणांगणात उतरलेल्या भारतीय तरुणाने व्यक्त केली 'ही'इच्छा

या बॉम्बहल्ल्यात मॅटर्निटी होममधल्या जखमी झालेल्या रक्ताळलेल्या अवस्थेतल्या गर्भवती महिला, लहानग्यांचे रडतानाचे, त्या अवस्थेतही त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांचे फोटो आणि व्हिडिओ असोसिएटेड प्रेसच्या (AP) पत्रकारांनी पोस्ट केले होते. याच भीषण अवस्थेत मारियुपोल शहरात आणखी एका गर्भवती महिलेचं सीझर करण्यात आलं. तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. बॉम्बहल्ल्यात या महिलेच्या हातापायाची बोटं तुटली आहेत. रशियानं केलेल्या हल्ल्यांमुळे युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये अशीच परिस्थिती असल्याचं युक्रेनच्या नागरिकांचं म्हणणं आहे. या युद्धामुळे युक्रेनमधली अनेक मोठी शहरं अक्षरश: उद्ध्वस्त झाली आहेत. सततच्या बॉम्ब हल्ल्यांमुळे लाखो नागरिकांनी आपला देश, आपलं राहतं घर सोडून अन्य देशांत आसरा घेतला आहे. जी उरलेली कुटुंबं तिथं आहेत त्यांना जीव वाचवण्यासाठी बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागतोय. रशियाच्या सशस्त्र दलांनी युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनचे 3,920 लष्करी तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं केला आहे. अर्थात या आकडेवारीवर युक्रेनकडून अजून काहीही उत्तर देण्यात आलेलं नाही. रशियानं युक्रेनच्या नागरिकांवर केलेल्या हल्ल्याचा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वॉल्डिमिर झेलेन्स्की यांनी तीव्र निषेध केला होता. रशियाचे हे हल्ले म्हणजे ‘युद्ध अपराध’ आणि ‘युक्रेनवासीयांच्या नरसंहाराचा पुरावा’ असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. बॉम्बहल्ल्यामुळे युक्रेनचं किती अतोनात नुकसान झालं आहे हे दाखवणारा एक व्हिडिओही झेलेन्स्की यांनी ट्विटरवर पोस्ट केला होता. या हल्ल्यामुळे निरपराध, निष्पाप नागरिकांचा बळी तर गेलाच आहे. लाखो नागरिक विस्थापित झाले आहेत. जे राहिले आहेत त्यांना अन्न-पाण्यासारख्या मूलभूत गरजांसाठीही झगडावं लागत आहे. वीज, पाणी, अन्न सगळ्याचाच तुटवडा निर्माण झाला आहे. युद्धाचे सगळ्यात गंभीर परिणाम सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागतात याचं हे उदाहरण.
First published:

Tags: Emotional, Russia Ukraine

पुढील बातम्या