Home /News /videsh /

पर्यटकांचा बेफिकीरपणा पडला महागात; रबरी बॉल गिळल्यानं प्राणी संग्रहालयातील पोलर बिअरचा मृत्यू

पर्यटकांचा बेफिकीरपणा पडला महागात; रबरी बॉल गिळल्यानं प्राणी संग्रहालयातील पोलर बिअरचा मृत्यू

लोकांच्या बेजबाबदारपणामुळे एका प्राणी संग्रहालयातील पोलर बिअरचा (Polarbare) जीव गेला आहे. एका लहान रबरी बॉलमुळे (Rubber ball) त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

नवी दिल्ली 22 एप्रिल: प्राणी संग्रहालयातील (Zoo) प्राण्यांना काहीही खायला देऊ नये, हात लावू नये अशा सूचना देऊनही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. लोकांना त्यात मजा वाटते, त्यामुळे ते आपल्याला हवे तेच करतात. त्यांची मजा होते पण; मुक्या, निष्पाप प्राण्यांना आपला जीव गमवावा लागतो. रशियातही (Russia) नुकतीच अशी एक घटना घडली असून लोकांच्या बेजबाबदारपणामुळे एका प्राणी संग्रहालयातील पोलर बिअरचा (Polar bear) जीव गेला आहे. रशियातील येकतेरिनबर्ग शहरातील प्राणी संग्रहालयात 19 एप्रिल रोजी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. उमका नावाचा 25 वर्षांचा पोलर बिअरचा (हिमअस्वल) आपल्या पिंजऱ्यात आपली न्याहारी करत असताना अचानक जमिनीवर कोसळला. तिथं असणाऱ्या त्याची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यानं तातडीनं मदतीसाठी हाक मारली; पण तोपर्यंत उशीर झाला होता. पशुवैद्यकीय डॉक्टरांची (Veterinary Doctors) तुकडी दहा मिनिटांत घटनास्थळी पोहोचली; पण तोपर्यंत उमका गेला होता. शवविच्छेदनानंतर त्याचा मृत्यू पोटात सापडलेल्या एका लहान रबरी बॉलमुळे (Rubber ball) झाला असल्याचं स्पष्ट झालं. हा रबरी बॉल प्राणी संग्रहालयात आलेल्या एखाद्या व्यक्तीनं उमकाकडे फेकला असावा, त्यानं तो गिळल्यानं त्याचा मृत्यू झाला, असा दावा प्राणी संग्रहालयातील कर्मचार्‍यांनी केला आहे. या घटनेनं त्यांना मोठा धक्का बसला असून इतकी वर्षे जीवापाड जपलेल्या अनाथ उमकाचा एखाद्या व्यक्तीच्या बेफिकीरपणाच्या कृत्यानं बळी जावा यामुळे इथले कर्मचारी दुःखी आणि हताश झाले आहेत. उमकाचं आयना नावाच्या मादी पोलर बिअरशी सख्य होतं. उमकाच्या मृत्यूनं आयनाही सैरभैर झाली आहे. डेली मेलशी बोलताना प्राणी संग्रहालयातील कर्मचारी येकाटेरिना उवारोव्हा यांनी सांगितले की, उमका आणि आयना दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते. दोघे बराच वेळ एकत्र घालवत. ते एकमेकांची काळजी घेत, आपली खेळणी एकमेकांना देत, दोघं एकत्र छान राहात होते. मोठ्या वयाच्या पोलर बेअर्समध्ये असं सख्य फार दुर्मिळ असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळं उमका गेल्यानंतर आयनाची स्थिती खूप वाईट झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. प्राणी संग्रहालयातील अधिकारी उमकाच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीचा शोध घेत नसले, तरी भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी ते आयनाची डोळ्यात तेल घालून काळजी घेत आहेत. 1998 मध्ये उमकाच्या आईला शिकाऱ्यांनी ठार मारल्यानंतर अनाथ झालेला छोटासा उमका अन्नाच्या शोधात भटकत असताना भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. तेव्हा रशियामधील चिकोत्का भागातील बिलिंग्ज गावातील स्थानिक नागरिकांनी त्याला वाचवलं आणि या प्राणी संग्रहालयाच्या स्वाधीन केलं होतं. या दुर्दैवी घटनेबाबत या प्राणी संग्रहालयानं काढलेल्या निवेदनात एका प्रवक्त्यानं म्हटले आहे की, ‘परिणामांचा विचार न करता अनेकवेळा सूचना देऊनही लोक प्राण्यांना खाण्याचे पदार्थ देतात किंवा वस्तू त्यांच्याकडे फेकतात हे अतिशय चुकीचे आहे.’ आपण एखाद्या निष्पाप जीवाच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो याचं साधं भानही लोकांना नसतं हेच यातून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. उमकाच्या अशा मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Death, International, Russia, Social media viral, Wild animal

पुढील बातम्या