डोमिनिका, 28 मे: पीएनबी बँक घोटाळ्यातील (PNB Scam) आरोपी आणि फरार डायमंड व्यापारी असेलला मेहुल चोक्सी (Mehul Choksi) याला डोमिनिका येथील सीआयडीने ताब्यात घेतले आहे. मेहुल चोक्सी याच्या विरोधात डोमिनिका कोर्टात (Dominica Court) सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाची आज सुनावणी पूर्ण झाली असून पुढील सुनावणी 2 जून रोजी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोमिनिका कोर्टाकडून मेहुल चोक्सी याला मोठा दिलासा मिळाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डोमिनिका कोर्टात आज झालेल्या सुनावणी दरम्यान मेहुल चोक्सी हा स्वत: न्यायालयात उपस्थित नव्हता तर त्याच्या वकीलाने त्याची बाजू मांडली. या सुनावणी दरम्यान कोर्टाने चोक्सीच्या प्रत्यार्पणास नकार दिला आहे. तसेच चोक्सीला वैद्यकीय सुविधा देण्याचं सांगण्यात आलं आहे. यासोबतच मेहुल चोक्सी याची कोविड टेस्ट सुद्धा होणार आहे.
मेहुल चोक्सी हा पीएनबी घोटाळ्यातील आरोपी आहे आणि त्याच्या विरुद्ध इंटरपोलनेही रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. पाच दिवसांपूर्वी तो अँटिग्वामधून गायब झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर 26 मे रोजी तो डोमिनिका देशात आढळून आला. डोमिनिकाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने त्याला ताब्यात घेतलं.
मेहुल चोक्सीची रवानगी 'या' देशाकडे, शरीरावर खुणा असल्याचा वकिलांचा दावा
मेहुल चोक्सीच्या अंगावर काही खुणा असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. विजय अगरवाल यांच्या दाव्यानुसार, गीतांजली समूहाच्या अध्यक्षांना काही जणांनी जबरदस्ती नेलं. त्यांना अँटिंग्वा येथून जहाजातून डोमिनिका येथे नेलं. अगरवाल यांनी असाही आरोप केला आहे की, चोक्सीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pnb bank