क्विडाँग सिटी, 05 नोव्हेंबर: एखादी व्यक्ती आपलं घर शोधत येणं हे ठीक आहे. पण एखादा पाळीव कुत्रा आपल्या मालकाकडे परत आला तर? वाचून आश्चर्य वाटलं ना? पण खरंच असं घडलं आहे. तब्बल 14 दिवस 100 किलोमीटर चालून एक कुत्री आपल्या मालकाकडे परतली. चीनच्या क्विडाँग सिटीत असाच आश्चर्यकारक प्रकार घडला. घरातल्या दुरुस्तीत अडथळा नको आणि कुत्र्याला त्रास नको म्हणून 2 वर्षांच्या 'पिंग अन' या कुत्रीच्या मालकांनी 62 मैलांवरच्या नॅनटाँगमध्ये आपल्या मित्राच्या घरी सोडलं होतं. जूनमध्ये कुत्र्याला सोडल्यानंतर तो सुखरूप आहे अशी मालकांची कल्पना होती पण त्या कुत्रीला तिच्या कुटुंबाची म्हणजे या मालकांची ओढ लागल्यामुळे ती त्या मित्राच्या घरून पळून गेली. नंतर 4 महिने तिचे मालक तिचा शोध घेत होते, असं जियांघाई इव्हिनिंग न्यूजच्या बातमीत म्हटलं आहे.
ही कुत्री मालकाच्या मित्राच्या घरातून पळाली आणि आपल्या मालकाकडे येण्यासाठी तिने 14 दिवसांत 100 किलोमीटरचा प्रवास केला. आणि ती क्विडाँग शहरात पोहोचली पण तिची अवस्था खूपच खराब झाली होती. एका ऑफिस बाहेर उभ्या कामगारांनी त्या कुत्रीची दयनीय अवस्था पाहिली व त्यांना दया आली. पिंग अनला जखमा झाल्या होत्या. तिच्या पंज्यांतून रक्त येत होतं आणि आपलं कुटुंब सापडत नसल्यामुळे ती निराश झाली होती. त्या कामगारांनी या कुत्रीचा फोटो आणि वर्णन व्हीचॅट या चीनी Appवर टाकलं. ती पोस्ट प्रचंड शेअर झाली आणि एका दिवसात पिंग अनचे मालक सापडले. मालक तिला घ्यायला आले. त्यानंतर मालकाचे त्या कुत्रीसोबत खेळतानाचा तिचे लाड करतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर प्रसिद्ध करण्यात आला. स्थानिक वृत्तानुसार मालकांनी कोणत्याही कारणासाठी कुत्रीला दूर ठेवायचं नाही असा निश्चय केला आहे. पिंग अनला व्हेटर्नरी डॉक्टरांकडून योग्य ट्रिटमेंट दिली जात आहे. अशा पाळीव प्राण्याला तुम्ही काय म्हणाल? दोस्त माझा मस्त...