Home /News /videsh /

पाकिस्तानात तयार झालेत ‘शुगर फ्री’ आंबे; आता मधुमेहींनाही आमरसावर आडवा हात मारण्याची संधी

पाकिस्तानात तयार झालेत ‘शुगर फ्री’ आंबे; आता मधुमेहींनाही आमरसावर आडवा हात मारण्याची संधी

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एका तरुण संशोधकानं 'शुगर फ्री' आंब्यांचा शोध लावला आहे. पाकिस्तानच्या बाजारात हे आंबे सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

    कराची, 25 जून: आंबा (Mango for diabetes) हे सगळ्यांच्याच आवडीचं फळ. उन्हाळ्याच्या मध्यावर अवतरणारा हा फळांचा राजा अगदी पावसाळा सुरु झाला तरी घराघरात हजेरी लावत असतो. मात्र त्यातील साखरेच्या प्रमाणामुळं (Sugar Level) मधुमेहींना (Diabetic Patients) मात्र आपला मोह आवरता घ्यावा लागतो. मधुमेहींची ही अडचण लक्षात घेऊन पाकिस्तानमधील (Pakistan) एका तरुणानं संशोधन केलं आणि साखरेचं प्रमाण अत्यल्प असणाऱ्या आंब्याच्या नव्या जातींचं (Sugar Free Mangoes) संशोधन केलं. असा आहे ‘शुगर फ्री’ आंबा साखर कमी असणाऱ्या वेगवेगळ्या 3 जाती पाकिस्तानमध्ये विकसित करण्यात आल्या आहेत. सोनारो (Sonaro), केट (Keitt) आणि ग्लेन (Glenn) अशी या तीन जातींची नावं आहेत. यामध्ये केवळ 4 ते 6 टक्के एवढंच साखरेचं प्रमाण असतं. त्यामुळं मधुमेहींना हे आंबे खाणं शक्य होणार आहे. सिंध प्रांतात असणाऱ्या एम. एच. पन्हवर फार्ममध्ये या आंब्याच्या जातींवर यशस्वी संशोधन करण्यात आलं आहे. पन्हवर यांचा पुतण्या गुलाम सरवार या तरूणाने ही कमाल केलीय. एम. एच. पन्हवर यांना पाकिस्तान सरकारनं आंबा आणि केळी या पिकांवरील संशोधनासाठी ‘सितारा-ए-इम्तियाज’ हा किताब देऊन सन्मानित केलं होतं. आपल्या काकांच्या संशोधनाचा हाच वारसा आपण पुढं नेल्याची प्रतिक्रिया गुलाम सरवार या तरुण संशोधकानं माध्यमांना दिली आहे. वेगवेगळ्या देशातील आंब्याच्या प्रजाती आणून त्या पाकिस्तानमधील जमिनीत उगवताना काय ट्रेंड दाखवतात, यावर संशोधन करता करता या ‘शुगर फ्री’ आंब्यापर्यंत आपण पोहोचलो, असं गुलामनं म्हटलंय. बस्स! फक्त 10 दिवसांतच...; टेन्शन वाढवणाऱ्या Delta plus बाबत महत्त्वाची अपडेट गुलामनं आंबा पिकाची काढणी केल्यानंतर त्याचं आयुष्य वाढवणं, आंब्यातील साखरेचं प्रमाण कमी करणं आणि नव्या संशोधित आंब्याचं अधिकाधिक उत्पादन घेणं या त्रिसुत्रीवर काम केलं. गुलामनं संशोधन केलेल्या केट या आंब्याच्या प्रकारात सर्वात कमी म्हणजे 4.7 टक्के साखर आहे. सोनारोमध्ये 5.6 टक्के तर ग्लेनमध्ये 6 टक्के साखरेचं प्रमाण असल्याचं सिद्ध झालं आहे. पाकिस्तानमधील विविध बाजारपेठांमध्ये हे आंबे सध्या विक्रीसाठी उपलब्ध असून त्यांची किंमत 150 रुपये किलो आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Diabetes, Pakistan

    पुढील बातम्या