Home /News /videsh /

इम्रान खान यांनी राजकारण सोडून क्रिकेटमध्ये परतावे, सिंधचे CM असे का म्हणाले?

इम्रान खान यांनी राजकारण सोडून क्रिकेटमध्ये परतावे, सिंधचे CM असे का म्हणाले?

imran khan

imran khan

पाकिस्तानमधील महागाई, कामगारांचे प्रश्न यासारख्या अनेक आघाड्यांवर इम्रान खान (Imran Khan ) यांचे सरकार अपयशी ठरत असल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

इस्लामाबाद, 1 नोव्हेंबर: पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान आणि माजी क्रिकेटर इम्रान खान (Imran Khan) सतत काहीना काही कारणांमुळे चर्चेत असतात. पाकिस्तानमधील महागाई, कामगारांचे प्रश्न यासारख्या अनेक आघाड्यांवर इम्रान खान यांचे सरकार अपयशी ठरत असल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका सुरू केलेली आहे. याच दरम्यान, आता पाकिस्तानमधील एका प्रांताच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर सडकून टीका केली आहे. इम्रान खान हे पंतप्रधानपदाची खुर्ची सांभाळण्यास सक्षम नाहीत. त्यापेक्षा त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा (PCB) कारभार सांभाळावा, अशी प्रतिक्रिया सिंध प्रांताचे मुख्यमंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते मुराद अली शाह (Murad Ali Shah) यांनी दिली आहे. मुख्यमंत्री शाह यांनी सोमवारी इस्लमाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. टीएलपीचा मुद्दा हाताळण्यात पंतप्रधान आणि त्यांचा पीटीआय पक्ष पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे पाकिस्तानमधील नागरिकांचे जीव जात आहेत. सर्वांना माहिती आहे, इम्रान खान यांचा पक्ष कशाप्रकारे सत्तेवर आला आहे. मात्र, देशातील जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ ( पीटीआय) पक्षाचा नक्की पराभव होईल, असा आपल्याला विश्वास असल्याचं मुराद अली शाह म्हणाले. पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांपासून तहरिक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) या पक्षानं शासनाविरोधात निषेध मोहिम सुरू केलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यामध्ये कामगारांनी देखील सहभाग घेतला असून त्यांनी सरकार विरोधात जोरदार निदर्शनं सुरू केली आहेत. यादरम्यान उसळलेल्या हिंसाचारात 11 टीएलपी (TLP) कार्यकर्ते आणि 8 पोलिसांसह एकूण 19 लोकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला. इम्रान खान देशातील अराजकता हाताळण्यात अपयशी ठरले आहेत. पंतप्रधान पद सांभाळण्यापेक्षा त्यांनी देशाचं क्रिकेट बोर्ड अधिक चांगल्या पद्धतीनं सांभाळलं असतं त्यांनी तेच सांभाळावं, अशी उपरोधिक टीका मुराद अली शाह यांनी केली. माध्यमांशी संवाद साधताना मुराद अली शाह यांनी युएईमध्ये सुरू असलेल्या टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये खेळत असलेल्या पाकिस्तानी क्रिकेट टीमबाबत आपली प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानची टीम अतिशय चांगला खेळ करत आहेत. आपला संघ फायनल जिंकेल अशी, आशा आहे. मात्र, पंतप्रधान इम्रान खान याठिकाणी देखील स्वत: श्रेय घेत असल्याचं मी ऐकलं आहे. म्हणूनचं मी म्हणतो की त्यांनी जाऊन क्रिकेट बोर्ड सांभाळावं, असा टोला मुराद शाह यांनी लगावला. पीटीआय सरकार सध्या आपल्याच कर्मांमुळं कोंडीत सापडलं आहे. त्यांनी केलेल्या कामांमुळं, 'धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय' अशी त्यांची अवस्था झाली आहे. देशाच्या भल्यासाठी सर्वांनी एकत्र बसून विचार केला पाहिजे, असं आवाहन देखील मुराद शाह यांनी केलं आहे.
First published:

Tags: Imran khan, Pak pm Imran Khan, Pakistan Cricket Board

पुढील बातम्या