इस्लामाबाद, 6 मार्च : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीमधील एक खडतर ‘टेस्ट’ जिंकली आहे. (Pakistan PM Imran Khan wins trust vote in National Assembly) पाकिस्तानच्या नॅशनल अॅसेब्ली (National Assembly) मध्ये त्यांच्या विरोधात अविश्वास दर्शक ठरावावर मतदान होतं. या मतदानावर प्रमुख विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला. 342 सदस्यांच्या या सभागृहात इम्रान खान यांना विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी 171 मतांची आवश्यकता होती. बहुमताच्या जादूई आकड्यापेक्षा (majic figure) 7 जास्त म्हणजे 178 मत इम्रान खान यांच्या बाजूनं पडली.
पाकिस्तान सिनेटच्या निवडणुकीत इम्रान खान सरकारमधील अर्थमंत्री अब्दुल हाफीज शेख (Abdul Hafeez Shaikh) यांचा पराभव झाला होता. पाकिस्तानमधील विरोधी पक्षांच्या पाकिस्तान डेमॉक्रॅटीक मुव्हमेंट (Pakistan Democratic Movement) या आघाडीचे उमेदवार आणि माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी (Yusuf Raza Gilani) यांनी चुरशीच्या लढतीत शेख यांचा पराभव केला. या पराभवानंतर इम्रान खान यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला होता.
विश्वासदर्शक ठरावाच्यापूर्वी इम्रान यांनी या आपल्या पक्षातील सदस्यांना गंभीर इशारा दिला होता. त्यांनी पाकिस्तान तहरीक ए इन्साफ (PTI) पक्षाच्या खासदारांना उद्देशून पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये पक्षाच्या निर्देशानुसारच मतदान करण्याची सूचना केली होती. ‘एखाद्या खासदारानं या निर्देशाच्या विरोधात मतदान केलं किंवा मतदानाला अनुपस्थित राहीला, तर त्याची निवडणूक आयोगाकडं तक्रार करण्यात येईल’, असा इशारा इम्रान यांनी दिला होता.
( LIVE TV वर देशाला उद्देशून भाषण करताना पंतप्रधान इम्रान खान अडखळतात तेव्हा... )
निवडणूक आयोगावरही आरोप
ज्या निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा इम्रान यांनी खासदारांना दिला होता, त्याच आयोगावर इम्रान यांनी आरोप केले होते. ‘तुम्ही वरिष्ठ पातळीवर भ्रष्टाचार होऊ दिला. सर्व काही तुमच्या डोळ्यासमोर झाले. मी सांगतो की, बाजार उघडला होता आणि लिलाव झाला. तुम्हाला सुप्रीम कोर्टानं संधी देऊनही तुम्ही फक्त 1500 मतपत्रिंकावर बार कोड का लावला नाही?’ असा आरोप इम्रान यांनी केला होता.
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानं इम्रान यांचे हे सर्व आरोप फेटाळले होते. ‘आम्ही कोणत्याही दबावामध्ये नव्हतो. अल्लाहची मर्जी असेल तर भविष्यातही येणार नाही. आम्ही कुणाला समाधानी ठेवण्यासाठी घटना आणि कायद्याकडे दुर्लक्ष करु शकत नाही.’ असं उत्तर पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानं त्यांच्या पंतप्रधानांना दिलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Election, International, Pak pm Imran Khan, Pakistan