Home /News /videsh /

भीषण विमान अपघात! पाकिस्तानचं प्रवासी विमान कराचीजवळ कोसळलं

भीषण विमान अपघात! पाकिस्तानचं प्रवासी विमान कराचीजवळ कोसळलं

लाहोरहून प्रवाशांना घेऊन निघालेलं पाकिस्तान एअरलाईन्सचं (PIA) विमान कराची विमानतळाच्या जवळच कोसळल्याचं वृत्त आहे

    कराची, 22 मे : पाकिस्तानचं प्रवासी विमान कराचीनजिक कोसळलं. लाहोरहून प्रवाशांना घेऊन निघालेलं पाकिस्तान एअरलाईन्सचं (PIA) विमान कराची विमानतळाच्या जवळच कोसळल्याचं वृत्त आहे. एअरबस 320 हे विमान कोसळलं आहे. यात सुमारे 100 प्रवासी असल्याचं समजलं. हे विमान निवासी भागात कोसळल्याची माहिती पुढे येत आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार कराची विमानतळाजवळच्या एका रहिवासी भागातच हे विमान कोसळलं आहे. विमान कसं कोसळलं आणि नेमकं किती आणि काय नुकसान झालं, याची माहिती अद्याप हाती आलेली नाही. पाकिस्तानने लॉकडाऊननंतर नुकतीच विमान सेवा सुरू केली होती. घरी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे जीव या अपघातात गेले आहेत. पाकिस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी असलेल्या पाकिस्तान एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने आत्ताच जाहीर केलेल्या माहितीनुसार, PK8303 हे विमान कराचीकडे येत होतं. त्यामध्ये 99 प्रवासी आणि 8 क्रू मेंबर होते. हे विमान अपघातग्रस्त झालं आहे. स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, अत्यंत गजबजलेल्या लोकवस्तीत विमान कोसळलं आहे. तिथे अँब्युलन्सची ये जा दिसते आहे. त्यामुळे या घटनेत मोठी हानी झाली असल्याची शक्यता आहे. अद्याप पाकिस्तानकडून अधिकृतपणे अपघातात झालेल्या नुकसानाबद्दल माहिती दिली गेलेली नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्वीट करून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. PIA विमान अपघाताबद्दल कळलं तेव्हा धक्का बसला. आत्ता प्राधान्य लोकांना वाचवण्याच्या कामाला आहे. या घटनेची लवकरात लवकर चौकशी होईल, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. (ही बातमी अपडेट होत आहे.) अन्य बातम्या पुण्यात कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, एकाच दिवशी आढळले इतके रुग्ण धक्कादायक! चीननंतर या देशाचा खोटारडेपणा उघड, तब्बल 19 हजार मृतांची माहिती लपवली सर्वात खास मित्र चीनने पाकला दिला धोका, इम्रान यांना लावला 32 अब्ज रुपयांचा चुना
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Pakistan

    पुढील बातम्या