नवी दिल्ली, 22 जानेवारी: Covid-19 च्या लशीला मंजुरी मिळाल्यानंतर आता सगळेच देश आपल्याला नागरिकांना ही लस लवकरात लवकर कशी मिळेल हे बघत आहेत. भारतात दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेली ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लस मोठ्या प्रमाणावर तयार आहे. या लशीला जगभरात मागणी आहे. तर दुसरी लस स्वदेशी आहे. भारत बायोटेकने ती तयार केली आहे. भारताच्या सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेली Covishield लस आतापर्यंत आपल्या देशातच नव्हे तर काही शेजारी देशांनाही मिळाली आहे. नेपाळ, मालदीव आणि बांग्लादेश या देशांना पाठवण्यात आली आहे. पण पाकिस्तान मध्ये ती अजूनही उपलब्ध झालेली नाही.
मुळात पाकिस्तानात लसनिर्मिती होण्याची शक्यता जवळपास नाही. त्यामुळे हा देश बाहेरच्या देशांत तयार झालेली लस आयात करून ती वापरण्यावरच भर देणार हे उघड आहे. त्यासाठी त्यांना मोठी किंमतही मोजावी लागणार आहे. पाकिस्तानची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता, त्यांच्यासमोर कोरोना लसीकरण हे न पेलणारं आव्हान असल्यासारखं आहे.
ड्रग रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ पाकिस्तान (Drap) ने आतापर्यंत ऑक्सफोर्ड अॅस्ट्राझेन्काची लस आणि चीनची सिनोफार्म या दोनच लशींच्या खरेदीला परवानगी दिली आहे. पण यावरसुद्धा अजून कोणतीच औपचारिक कार्यवाही झाल्याचं स्पष्ट नाही. आपल्या देशाच्या 70% लोकांना लसीकरण करण्याचं पाकिस्तान सरकारचं ध्येय आहे. त्यासाठी त्यांना कोट्यवधी डोसांची आवश्यकता आहे. ऑक्सफर्डच्या Astrazenka ने तयार केलेल्या लशीचा प्रभाव हा 90% असून पाकिस्तानने सगळ्यात आधी ह्याच लशीच्या वापराला मंजुरी दिली आहे. या लशीचा प्रती डोस पाकिस्तानला 6 ते 7 डॉलरला एवढी पडेल असं इथल्या स्थानीय अधिकृत वितरकांचं म्हणणं आहे. त्यापेक्षा भारतात तयार झालेली हीच लस त्यांना स्वस्तात मिळू शकते. सीरमने हीच लस उत्पादित केली आहे आणि भारत सरकारला 200 रुपयांत ती उपलब्ध करून देत आहेत.
सिंध मेडिकल हे पाकिस्तान मधील वैक्सीन आणि इतर औषधं आयात करणाऱ्यांमध्ये एक मोठं नावं आहे. त्याचे प्रतिनिधी उस्मान गनी ह्यांनी डॉन वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की,' सरकारने अॅस्ट्राझेन्का वॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी आयात करायची परवानगी दिली आहे. ड्रग रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ पाकिस्तानने तिची अधिकृत नोंदणी देखील केली आहे. पण कंपनी कडून अजून कोणतीच लिखीत स्वरूपाची परवानगी किंवा व्यवहार झालेला नाही. एवढचं नाही तर लशीची किंमत देखील अजून ठरवली गेली नाहीय. पण 6 ते 7 अमेरिकी डॉलर मध्ये वैक्सीन मार्केटला येईल अशी आम्हाला आशा आहे.' पाकिस्तानच्या स्थानिक वृत्त माध्यमांच्या मते, यापेक्षा अधिक किंमत मोजून ती खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे अल्पदरात उपलब्ध होऊ शकेल अशी भारतीय लस कधी मिळणार याची प्रतीक्षा पाकिस्तानला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus, Pakistan