नसीरिया, 13 जुलै: इराकच्या (Iraq) दक्षिण भागातील नसीरिया शहरातील अल-हुसेन कोविड रुग्णालयात सोमवारी भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत 2 आरोग्य कर्मचाऱ्यांसह 44 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 67 हून अधिक लोकं जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली आहे. कोविड वॉर्डातील ऑक्सिजनच्या सिलेंडरचा विस्फोट झाल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलीस या आगीचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
या दुर्दैवी घटनेनंतर पंतप्रधान मुस्तफा अल-कदिमी यांनी तातडीनं वरिष्ठ मंत्र्यांची बैठक घेतली. तसेच नसीरिया रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थापकांना निलंबित करून अटकेचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
हेही वाचा-इराणमध्ये अडकलेल्या मुलाला परत आणण्यासाठी मुंबईतील बापाची पंतप्रधानांना साद
मृतांची संख्या वाढण्याची भीती
या अपघातानंतर, आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड रुग्णालयातून अनेक रुग्णांचे जळलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढले, तर अनेक रुग्ण धुरामुळे गुदमरून बेशुद्धावस्थेत आढळले आहे. ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास सुरू करण्यात आला आहे. आगीचं नेमकं कारण शोधलं जात आहे. अनेक लोकांची प्रकृती गंभीर असल्यानं मृतांची संख्या वाढू शकते. त्याचबरोबर बरेच लोकं अद्याप बेपत्ता असल्याची माहितीही समोर आली आहे.
हेही वाचा-भयंकर प्रथा: गर्भवती पत्नीला उचलून पती चालतो जळत्या कोळशांवरून
यापूर्वीही बगदादमध्ये 82 जणांचा होरपळून मृत्यू
यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला बगदाद येथील एका कोरोना रुग्णालयात भीषण आग लागली होती. ज्यामध्ये 82 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर 110 लोकं गंभीर जखमी झाले होते. युद्ध आणि निर्बंधांमुळे अगोदरच इराकची आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली आहे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या लढाईत अनेक अडचणी येत आहेत. आतापर्यंत इराकमध्ये 14.38 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर 17,592 लोकांचा मृत्यू झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fire