ओमानच्या सुलतानचे निधन, लिफाफ्यातील 'गूढ' कधी उलगडणार

ओमानच्या सुलतानचे निधन, लिफाफ्यातील 'गूढ' कधी उलगडणार

ओमानवर 50 वर्ष राज्य करणाऱ्या सुलतान काबूस बिन सईद यांनी दोन लिफाफे त्यांच्या मृत्यूपश्चात मागे ठेवले आहेत. यात दडलेलं एक गूढ दोन दिवसांत उलगडणार आहे.

  • Share this:

मस्कत, 11 जानेवारी : ओमान (Oman) चे सुलतान काबूस बिन सईद (Sultan Qaboos bin Said) यांचे प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. अरबी देशांमध्ये सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे सुलतान म्हणून त्यांची ओळख आहे. ओमानवर त्यांनी 50 हून अधिक वर्षे राज्य केलं. त्यांच्या कार्यकाळात ओमानला मॉडर्न देश म्हणून विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. यासाठी त्यांना मॉडर्न ओमानचा जनक असंही म्हटलं जातं. त्यांच्या निधनामुळे ओमान शोकसागरात बुडाला आहे.

काबूस बिन सईद यांच्या निधनानंतर आता त्यांनी मागे ठेवलेल्या लिफाफ्यात ओमानचे भविष्य आणि गूढ दडले आहे. एकीकडे लोक शोक व्यक्त करत असतानाच त्यांनी ठेवलेल्या लिफाफ्याबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे. आता ओमानचे लोक लिफाफा उघडण्याचीही वाट बघत आहेत.

सुलतान काबूस बिन सईद यांना अपत्य नाही. त्यांचे लग्न झाले होते मात्र संतती झाली नव्हती. त्यांच्या मृत्यूच्या आधीच उत्तराधिकाऱी कोण याची चर्चा सुरू होती. शेवटपर्यंत उत्तराधिकाऱ्याची घोषणा केली नव्हती. सुलतान काबूस बिन सईद यांना कर्करोग झाला होता. त्यांनी उपचार केले मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. मृ्त्यू कधीही येऊ शकतो हे माहिती असतानाही त्यांनी वारस कोण ते सांगितलं नव्हतं. त्यासाठी त्यांनी लिफाफ्यात नाव लिहून ठेवलं आहे.

ओमानची गादी आता कोण सांभाळणार याचे उत्तर काबूस बिन सईद यांनी लिफाफ्यात लिहून ठेवलं आहे. जिवंतपणीच ते उत्तराधिकारी निवडू शकले असते पण त्यांनी लिफाफ्यातून निवड करण्याचे ठरवले. त्यांच्या मृत्यूनंतर तो लिफाफा उघडण्यात यावा असंही त्यांनी सांगितलं होतं.

दोन लिफाफ्यात एक गूढ

सध्या मस्कतमध्ये असलेल्या राजमहालात काबूस बिन सईद यांनी लिहिलेला लिफाफा ठेवण्यात आला आहे. तो उघडल्यानंतरच उत्तराधिकारी कोण ते समजणार आहे. असंही सांगितलं जातं की, आणखी एक लिफाफा आहे. तो ओमानमधील दक्षिण भागात असलेल्या राजमहालात ठेवण्यात आला आहे. त्यातही ओमानच्या सुलतान काबूस बिन सईद यांनी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचे नाव लिहले आहे. पहिला लिफाफा मिळाला नाही तर दुसऱ्या लिफाफ्याच्या आधारे निवड करता येईल असं त्यामागे प्रयोजन आहे. त्याशिवाय असंही म्हटलं जात आहे की, जर पहिल्या नावावर कोणाचे दुमत असेल किंवा वाद झाला तर दुसऱ्या नावावर विचार करता येईल यासाठी दुसरा लिफाफा आहे.

वडिलांकडून गादी हिसकावून घेतली

गेल्या 14 पिढ्यांपासून सईद कुटुंबीय ओमानवर राज्य करत आहेत. मात्र, सुलतान निवडण्यासाठी कोणताही नियम नाही. काबूस बिन सईद 1970 मध्ये सुलतान झाले होते. त्यांना वारसा हक्काने ही गादी मिळाली नव्हती तर त्यांनी मिळवली होती. ओमानवर काबूस बिन सईद वडिलांचे 1970 च्या आधी राज्य होते. ते आजारी आणि मानसिक दृष्ट्या कमजोर झाले होते. तरीही गादी सोडत नव्हते. तेव्हा ओमान मागासलेला देश होता. त्यावेळी ब्रिटनने काबूस बिन सईद यांना उत्तराधिकारी म्हणून समर्थन दिलं. तेव्हा रागाने सईद यांच्या वडिलांना बंदूक काढली. त्यावेळी अपघाताने बंदुकीतून सुटलेली गोळी त्यांच्याच पायात लागली. त्यानंतर उपचारासाठी लंडनला गेले असताना दोन वर्षांनी तिथेच त्यांचा मृत्यू झाला.

मॉडर्न ओमानचे जनक

काबूस बिन सईद यांच्या हातात सत्ता येताच ओमानचा चेहरा मोहरा बदलण्यास सुरुवात झाली. ओमानमध्ये त्यावेळी फक्त 3 शाळा होत्या. तर रस्त्यांची अवस्थाही बेकार होती. त्यानंतर काबूस यांनी ओमानमध्ये विकास केला. तिथं शेती सर्वाधिक केली जात होती. त्यांनी तेल आणि गॅस उद्योगातून मिळणाऱ्या पैशातून देशात अनेक विकासकामे केली. 33 लाख लोकसंख्येचा हा देश आखाती देशातील प्रगत देशांपैकी एक म्हणून ओळखला जातो. शिक्षणापासून सामाजिक कार्यातही ओमान अग्रेसर आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत असून श्रीमंत लोकांचेही प्रमाण जास्त आहे.

वाचा : विमान दुर्घटना नव्हे चूक! अमेरिकेनं 31 वर्षांपूर्वी केलं तेच आता इराणकडून घडलं

Published by: Suraj Yadav
First published: January 11, 2020, 2:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading