Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

काय सांगता! आता मानवाच्या विष्ठेपासूनही होणार ऊर्जानिर्मिती? इस्रायली शास्त्रज्ञांना आलं यश

काय सांगता! आता मानवाच्या विष्ठेपासूनही होणार ऊर्जानिर्मिती? इस्रायली शास्त्रज्ञांना आलं यश

मानवाच्या विष्ठेपासून तयार होणार ऊर्जा

मानवाच्या विष्ठेपासून तयार होणार ऊर्जा

एक संशोधनात इस्रायलच्या शास्त्रज्ञांनी मानवी मल किंवा विष्ठा (Human Poop) हा ऊर्जेचा मोठा स्रोत ठरू शकतो असा निष्कर्ष नोंदवला आहे.

जगभरात हवामानबदलाचे दुष्परिणाम (climate Change) रोखण्यासाठी नानाविध प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक देश या समस्येवर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करत आहे. यातूनच शून्य कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. हवामानबदल, प्रचंड लोकसंख्या यामुळे पाणी, नैसर्गिक खनिजं यांचे पृथ्वीवरचे साठे संपत चालले आहेत. त्यामुळे ऊर्जानिर्मितीसाठी पाणी, कोळसा यांऐवजी अन्य स्रोतांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे. वारा, सूर्यप्रकाश या नैसर्गिक, पण अपारंपरिक स्रोतांच्या माध्यमातून वीजनिर्मितीवर (Generation of Electricity by human poop) भर देण्यात येत आहे. वीजनिर्मितीसाठी अन्य पर्यायांबाबतही संशोधन केलं जात आहे. अशाच एक संशोधनात इस्रायलच्या शास्त्रज्ञांनी मानवी मल किंवा विष्ठा (Human Poop) हा ऊर्जेचा मोठा स्रोत ठरू शकतो असा निष्कर्ष नोंदवला आहे. अत्यंत आश्चर्यकारक असं हे संशोधन आहे.

बेन-गुरियन विद्यापीठातील (Ben-Gurion University) शास्त्रज्ञांनी याबाबत संशोधन केलं असून, त्यांनी मानवी मलाचा वापर करून कोळशासारखा (Charcoal) एक ज्वलनशील पदार्थ तयार करण्यात यश मिळवलं आहे. 'पॉप्युलर सायन्स'मध्ये याबाबतचा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. मानवी मलाचा वापर करण्याआधी या शास्त्रज्ञांनी टर्की (Turkey) आणि कोंबडीच्या (Chicken) विष्ठेवर हा प्रयोग करून पाहिला होता; मात्र त्यातून मोठ्या प्रमाणात कोळशासारखा ज्वलनशील पदार्थ निर्माण होण्याची शक्यता नसल्याचं दिसून आलं. कोंबडीच्या विष्ठेद्वारे निर्माण होणारा पदार्थ 10 टक्के कोळशाची जागा घेऊ शकतो, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे; मात्र मानवी आहारात असणाऱ्या वैविध्यपूर्ण आहारामुळे मानवी मल अधिक उपयुक्त आहे, असं त्यांच्या लक्षात आलं. ज्या व्यक्ती तेल जास्त प्रमाणात खातात, त्यांच्या मलातून अधिक ऊर्जा मिळू शकते असा विश्वास या शास्त्रज्ञांना आहे. त्यामुळे त्यांनी मानवी मलावर प्रयोग करून त्यातून कोळशासारखा एक ज्वलनशील, ऊर्जानिर्मिती करणारा पदार्थ तयार केला आहे.

या प्रयोगासाठी इस्रायलमधल्या 'पूप व्हॉलन्टियर्स'नी (poop Volunteers) मानवी मलमूत्र गोळा केलं. याकरिता शास्त्रज्ञांनी नेगेव वाळवंटात एक फिल्ड लॅव्हेटरी तयार केली होती, जिथे अनेक जण दररोज मलमूत्र विसर्जन करत. पूप व्हॉलन्टियर्स प्रत्येक दिवसाच्या शेवटी मानवी मल गोळा करत. त्यानंतर त्यातले जंतू नष्ट करण्यासाठी तो ऑटोक्लेव्हमध्ये गरम केला जाई. त्यानंतर, कोरड्या स्वरूपातला मानवी मल बारीक केला जाई, जेणेकरून शास्त्रज्ञांना काम करणं सुरक्षित होईल.

'मानवी मल अशा कोरड्या आणि पावडर स्वरूपात असल्यानं त्याचं मूळ स्वरूप काय होतं ते लक्षात येत नव्हतं,' असं बेन-गुरियन विद्यापीठातल्या पर्यावरण जलविज्ञान आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे अध्यक्ष अमित ग्रॉस यांनी नमूद केलं.

यानंतर ही गडद-तपकिरी रंगाची पावडर पाण्यात मिसळून 50 मिली प्रमाणात उच्च प्रमाणातली उष्णता आणि दाब हाताळण्यास सक्षम असलेल्या 9 रिअॅक्टर्समध्ये ठेवण्यात आली. त्यानंतर या मिश्रणावर 180-240 अंश सेल्सिअसपर्यंत वेगवेगळ्या तापमानांवर प्रयोग करण्यात आले. 30 मिनिटांपासून दोन तासांपर्यंत हे मिश्रण तापवलं गेलं. ही पद्धत हायड्रोथर्मल कार्बनायझेशन (HTC) म्हणून ओळखली जाते. हायड्रो-चार (Hydro char) म्हणजे कोळशासारखा ज्वलनशील पदार्थ तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. पाणी आणि जळलेल्या बायोमासचा समावेश असलेला हा जाड तपकिरी रंगाचा पदार्थ असतो.

कोळशावर चालणाऱ्या वीज प्रकल्पांच्या भट्टीमध्ये हायड्रो-चारचा इंधनाप्रमाणे वापर केला जाऊ शकतो. कोळशासारखा ज्वलन गुणधर्म तयार करण्यासाठी पाणी हायड्रो-चारपासून वेगळं करणं आवश्यक आहे. यातून काढलेलं पाणी हे सुरक्षित सेंद्रिय खत (organic Fertilizer) म्हणून वापरता येतं. असा दुहेरी लाभ या मानवी मलापासून तयार कारण्यात आलेल्या हायड्रो-चारमधून मिळू शकतो, असंही शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे.

खरं तर, मानवी मलमूत्र म्हणजे अत्यंत घाण मानलं जातं. त्यापासून बायोगॅसद्वारे ऊर्जा निर्मिती केली जाते. आता या शास्त्रज्ञांनी नवी संकल्पना वापरून या घाणीतून अत्यंत मौल्यवान खजिना निर्माण केला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

First published:

Tags: Israel