मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

G20-Summit : आता दरवर्षी 3 हजार भारतीयांना मिळणार यूकेचा व्हिसा; मोदी-सुनक यांच्या भेटीनंतर मोठा निर्णय

G20-Summit : आता दरवर्षी 3 हजार भारतीयांना मिळणार यूकेचा व्हिसा; मोदी-सुनक यांच्या भेटीनंतर मोठा निर्णय

 इंडोनेशियातील बाली येथे झालेल्या जी-20 शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यात बैठक झाली

इंडोनेशियातील बाली येथे झालेल्या जी-20 शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यात बैठक झाली

इंडोनेशियातील बाली येथे झालेल्या जी-20 शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यात बैठक झाली

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : 2023 मध्ये यूके आणि भारत 'यंग प्रोफेशनल्स एक्सचेंज प्रोग्रॅम' सुरू करणार आहे. या अंतर्गत दरवर्षी तीन हजार भारतीय तरुणांना यूकेमध्ये काम करण्यासाठी व्हिसा मिळणार आहे. बुधवारी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भारतातील तरुणांना यूकेमध्ये काम करण्यासाठी दरवर्षी तीन हजार व्हिसा देण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. अशा योजनेचा लाभ घेणारा भारत हा पहिलाच देश असल्याचं यूके सरकारनं म्हटलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऋषी सुनक यांच्या भेटीच्या काही तासांनंतरच हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

ब्रिटनचं पंतप्रधान कार्यालय, डाउनिंग स्ट्रीटनं याबाबत एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, यूके-इंडिया यंग प्रोफेशनल्स स्कीमला आज मान्यता मिळाली आहे. ज्यामध्ये 18 ते 30 वयोगटातील तीन हजार पदवीधर भारतीय नागरिकांना यूकेमध्ये कारण करण्यासाठी व्हिसा मिळेल. हा व्हिसा मिळाल्यानंतर भारतीय व्यक्ती यूकेमध्ये दोन वर्षे राहून काम करू शकतील. म्हणजेच यूके-इंडिया यंग प्रोफेशनल्स स्कीम अंतर्गत, दरवर्षी तीन हजार भारतीय तरूण ब्रिटनमध्ये जाऊ शकतील. ही योजना पुढील वर्षी म्हणजेच 2023 च्या सुरुवातीला सुरू होईल.

मंगळवारी (15 नोव्हेंबर) इंडोनेशियातील बाली येथे झालेल्या जी-20 शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर काही तासांतच यूकेने भारतीय तरुणांना व्हिसा देण्याच्या निर्णयाला मान्यता दिली. भारतीय वंशाच्या सुनक यांनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्यापासून मोदी आणि त्यांची ही पहिलीच बैठक होती.

(Elon Musk यांना अमेरिकेच्या नियामकाकडून गंभीर इशारा; कायद्याची करून दिली आठवण )

'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, ऋषी सुनक यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, "भारतासोबत असलेल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांचं मूल्य मला माहित आहे. भारतातील अधिकाधिक हुशार तरुणांना आता यूकेमध्ये येण्याची संधी मिळेल, याबाबत मला आनंद वाटत आहे. त्यांना येथील जीवन, अर्थव्यवस्था आणि समाजाला समृद्ध करणाऱ्या सर्व गोष्टींचा अनुभव घेण्याची संधी मिळेल."

यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या डाऊनिंग स्ट्रीट येथील कार्यालयानं एका प्रेस नोटमध्ये म्हटलं आहे की, 'इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील इतर कोणत्याही देशापेक्षा यूकेचे भारताशी घनिष्ठ संबंध आहेत. यूकेमधील जवळपास एक चतुर्थांश आंतरराष्ट्रीय विद्यार्थी भारतातील आहेत आणि भारतीय गुंतवणुकीमुळे यूकेमध्ये 95 हजार नोकऱ्या निर्माण होतात.' यंग प्रोफेशनल्स स्कीम ही यूके आणि भारताच्या संबंधांसाठी एक महत्त्वपूर्ण क्षण असल्याचंही यूके पंतप्रधान कार्यालयचं म्हणणं आहे.

(Amazon Layoffs : नोकरदारांनो, सावधान! फेसबुकनंतर आता Amazon कडून तब्बल 10 हजार कर्मचाऱ्यांना नारळ)

ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयानं सांगितलं की, नवे पंतप्रधान ऋषी सुनक संतुलित करारासाठी कटीबद्ध आहेत. भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारावर (FTA) सखोल चर्चा सुरू आहे. सुनक यांनी यूकेच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. ज्यामध्ये दोन्ही बाजूंनी एफटीएसाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भविष्यात दोन्ही देशांसाठी फायदेशीर असलेल्या संतुलित व्यापार करारावर लक्ष केंद्रित केलं जाईल. त्यासाठी कोणतीही अंतिम मुदत ठरवण्यात आलेली नाही. ब्रिटनमधील एका प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देश यासाठी वचनबद्ध आहेत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विभागाच्या नेतृत्वाखाली वाटाघाटी सुरू आहेत.

First published:

Tags: Pm modi