प्योंगयांग, 20 डिसेंबर : उत्तर कोरियाचे (North Korea) हुकूमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्या सणकीपणाचे अनेक किस्से जगप्रसिद्ध आहेत. त्याने आजवर अगदी शुल्लक भासणाऱ्या कारणांमुळे सामान्य नागरिकांपासून ते नातेवाईकांपर्यंत अनेकांची हत्या केली आहे. किम जोंगची सणकी वृत्ती त्यांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये देखील पूरेपूर भिनली आहे. या अधिकाऱ्यांनी नुकतीच एका जहाजाच्या कॅप्टनची सर्वांसमोर गोळी मारुन हत्या केली. हा कॅप्टन बंदी असलेल्या परदेशी रेडिओच स्टेशनंच प्रसारण ऐकत होता.
काय आहे प्रकरण?
‘रेडिओ फ्री एशिया’ (RFA) ने दिलेल्या वृत्तानुसार चोई असं या प्रकरणात हत्या झालेल्या कॅप्टनचे नाव आहे. चोई हा 50 जहाजांचा मालक होता. त्याच्या एका स्टाफने तो बंदी घातलेल्या रेडिओचं प्रसारण ऐकत असल्याची माहिती लष्कराला दिली. त्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी सर्व स्टाफ समोर त्याची गोळ्या झाडून हत्या केली.
चोई हा पूर्वी लष्करात रेडिओ ऑपरेटर होता. त्या नोकरीच्या दरम्यान त्याने विदेशी ब्रॉडकास्ट ऐकण्यास सुरुवात केली होती. उत्तर कोरियाच्या नियमानुसार लष्कराची नोकरी सोडलेल्या अधिकाऱ्यांना या रेडिओचं प्रसारण ऐकता येत नाही. या प्रकरणानंतर त्या भागात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्यांची देखील हकालपट्टी करण्यात आली आहे. या सर्वांची आता चौकशी करण्यात येणार असून त्यानंतर उत्तर कोरियातील नियमांप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. या अधिकाऱ्यांवर चोईच्या अपराधांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांनी त्याच्याकडून कोणती लाच स्विकारली होती का? याचीही चौकशी केली जाणार आहे.
इतरांना इशारा
‘चोईचं जहाजतील कर्मचाऱ्यांशी पटत नव्हते, त्यामुळेच त्याची तक्रार लष्करी अधिकाऱ्यांकडं करण्यात आली,’ अशी माहिती देखील आता उघड झाली आहे. उत्तर कोरियात कोणत्या विदेशी रेडिओचं प्रसारण ऐकावं याची किम जोंग सरकारनं कडक नियमावली केली आहे. सरकारच्या या नियमांचं उल्लंघन करुन अनेक नागरिक छुप्या पद्धतीनं विदेशी रेडिओ ऐकतात. या सर्वांना कडक इशारा देण्यासाठी चोईची हत्या करण्यात आली आहे.