अबुधाबी, 04 जून: संयुक्त अरब अमिराती येथील न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेल्या भारतीय तरुणाची अखेर सुटका झाली आहे. अबुधाबीतील लुलु ग्रुपचे अध्यक्ष आणि अब्जाधिश एनआरआय उद्योजक असणाऱ्या एम ए युसुफ अली यांनी केलेल्या मदतीमुळे संबंधित भारतीय तरुणाचा मृत्यूदंड टळला आहे. 2013 पासून हा भारतीय तरुण अरब देशातील तुरुंगात खितपत पडला होता. केरळातील थ्रीसूर येथील रहिवासी असणाऱ्या कृष्णनला अबुधाबीतील कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती.
नेमकं प्रकरण काय आहे?
केरळमधील थ्रीसूर येथील रहिवासी असणार कृष्णन हा अबुधाबीतील एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. 7 सप्टेंबर 2012 रोजी कृष्णन आपल्या कारने प्रवास करत होता. त्यावेळी अचानक झालेल्या अपघातात एका सुदानी चिमुकलीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अबुधाबीतील न्यायालयाने 2013 साली कृष्णनला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून तो अरब देशातील तुरुंगात खितपत पडला होता. त्याला वाचवण्यासाठी कृष्णनच्या कुटुंबीयांनी अतोनात प्रयत्न केले. पण त्याला कोणताही दिलासा मिळाला नाही. कृष्णननेही आशा सोडून दिली होती.
पण अबुधाबीतील एनआरआय उद्योजक एम ए युसुफ अली यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी कृष्णनच्या सुटकेसाठी पीडित सुदानी परिवाराला 5 लाख दिराम (99 लाख 35 हजार रुपये ) देण्याची ऑफर दिली. ही रक्कम स्विकारून सुदानी कुटुंबीयांनी कृष्णनला शिक्षा माफ करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे आता कृष्णनची शिक्षा माफ झाली आहे. पुढच्या आठवड्यात कृष्णन मायदेशी परतणार आहे. आपलं मुलं परत घरी येणार याची माहिती मिळाल्यानंतर कृष्णनच्या कुटुंबीयांना अश्रू रोखता आले नाहीत.
हे ही वाचा-मेहुल चोक्सीचं भारतात प्रत्यार्पण होणार? आज डोमिनिका न्यायालय देणार निकाल
अबुधाबीतील एनआरआय उद्योजक एम ए युसुफ अली यांची एकूण संपत्ती 490 कोटी यूएस डॉलर (35 हजार 765 कोटी रुपये) इतकी असल्याची माहिती गेल्या वर्षी फोर्ब्ज मासिकाने दिली होती. त्यापैकी 1 लाख 36 हजार 129 यूएस डॉलर (अंदाजे एक कोटी रुपये) त्यांनी कृष्णनसाठी सुदानी कुटुंबाला दिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Kerala, UAE