काठमांडू, 13 जुलै : भारतीय हद्दीतला काही भाग आपला म्हणून सांगत नवा नकाशा संमत करून घेणाऱ्या नेपाळच्या पंतप्रधानांनी आता रामही आमचा, असा विचित्र दावा केला आहे. नेपाळी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी 'खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे आणि श्रीराम हे भारतीय नसून नेपाळीच आहेत', असा दावा केल्याचं वृत्त काही नेपाळी माध्यमांनी दिलं आहे.
नेपाळ आणि भारताचे संबंध गेल्या काही महिन्यांपासून बिघडले आहेत. नेपाळने भारताच्या हद्दीतले लिपुलेख आणि कल्पानी हे प्रदेश आपले असल्याचा दावा करत नेपाळच्या नकाशात त्याला स्थान दिलं. नुसता नकाशा बदलून हा देश स्वस्थ बसला नाही, तर इतरही छुपे भारतविरोधी उद्योग तिथे सुरूच आहेत.
मध्यंतरी के. पी. शर्मा ओली यांचं सरकार मध्यंतरी धोक्यात आलं होतं. त्या वेळीसुद्धा ओली यांनी भारतानेच सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.
मे महिन्यापासून दोन देशांमधल्या मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नेपाळ सीमेजवळ लिपुलेख खिंड ते उत्तराखंडमधल्या धारचुला या ठिकाणाला जोडणारा 80 किमी च्या रस्त्याच्या कामाचं उद्धाटन केलं. हा रस्ता सामरिक दृष्टीने महत्त्वाचा आहे. नेपाळने हा रस्ता आपल्या हद्दीतून जात असल्याचं सांगत त्याला विरोध दर्शवला आहे.
या रस्त्याच्या उद्घाटनानंतर नेपाळने नवा नकाशा तयार केला आणि त्यात लिपुलेखसह कालापानी आणि लिम्पियाधुरा या ठिकाणांचा समावेश आपल्या देशात दर्शवला.
चीनबरोबरच्या सीमावादावर चर्चा सुरू असतानाच आता नेपाळने भारताबरोबर नवा सीमावाद उकरून काढला. भारतीय भूभाग गिळंकृत करणाऱ्या नकाशाला नेपाळमध्ये अधिकृत मान्यता दिल्यानंतर या छोट्या शेजारी देशाने नवा वाद निर्माण केला. दोन देशांच्या सीमेवरच्या No Man's Land वर हक्क सांगत नेपाळ पोलिसांनी तिथे नवा फलक लावला. हा मैत्री पूल दोन्हीपैकी कुठल्याच देशाच्या हद्दीत येत नाही. पण आता नेपाळने मुद्दाम तिथेच सीमा सुरू होत असल्याचा बोर्ड लावला. आता आणखी एक वाद निर्माण करत चक्क प्रभू श्रीराम नेपाळी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nepal