लंडन, 18 एप्रिल : ज्यांना युद्ध करण्याची हिंमत नाही. जे पाठीत वार करतात त्यांना त्याच भाषेत उत्तर देणार. हा मोदी आहे हे लक्षात घ्यावं अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सज्जड दमच भरला. तसंच कठुआ प्रकरणही देशासाठी लाजिरवाणी आणि दुर्दैवी घटना आहे. बलात्कार हा बलात्कार असतो, ती एक विकृती आहे याच राजकारण करू नका असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी केलंय.
लंडनमधील वेस्टमिंस्टर सेंट्रल हाॅलमध्ये 'भारत की बात सबके साथ' कार्यक्रम मोठ्या दिमाखात सुरू आहे. सेंन्सार बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी सरकारच्या कार्याचा पाढा वाचला आणि येणाऱ्या काळात कामाची आश्वासनंही दिली.
'बलात्कार बलात्कार असतो आणि विकृत असतो'
कठुआ प्रकरणावर पंतप्रधान बोलले. या प्रकरणाचं राजकारण करू नका. पालक नेहमी मुलींनाच प्रश्न विचारतात, पालकांनी जरा मुलांनाही प्रश्न विचारले पाहिजे. ते कुठे जातात? काय करतात? हे प्रश्न मुलांना विचारले पाहिजे. समाजातली ही विकृती आहे असं परखड मत मोदींनी मांडलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला कडक इशारा
ज्यांना युद्ध करण्याची हिंमत नाही. जे पाठीत वार करतात त्यांना त्याच भाषेत उत्तर देणार. हा मोदी आहे हे लक्षात घ्यावं. कॅम्पमध्ये झोपणाऱ्या जवानांवर गोळी झाडणाऱ्या लोकांना त्याच भाषेत उत्तर दिलं, अशा वेळी आम्ही काय झोप काढायची काय? आम्ही जे ठरवलं ते आमच्या जवानांनी केलं अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी पाकला सुनावलं.
भारतानं कुठल्याही युगात कुणाचीही जमीन हडपण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात भारतानं कुणाची एक इंच जमीनही घेतली नाही. पण दिड लाख भारतीय या युद्धात शहीद झाले असंही मोदी म्हणाले.
सर्जिकल स्ट्राईकची कामगिरी फत्ते झाल्यावर पहिले आम्ही पाकिस्तानला सांगितलं नंतर जगाला माहिती दिली. दहशतवाद निर्यात करणाऱ्यांना हा धडा होता असा खुलासाच मोदींनी केला.
माझ्याकडून अपेक्षा ठेवल्या जातात. पण सव्वाशे कोटी लोकांचा मिळून हा देश आहे आणि हे सर्व लोकांचं देश घडवण्यात योगदान आहे. विकास हे जन आंदोलन बनावं. फक्त मोदी काहीच करू शकणार नाही विकास हे जनआंदोलन व्हावे अशी इच्छा पंतप्रधान मोदींनी बोलून दाखवली.
'मी एकटा देश बदलू शकत नाही'
माझ्या हातून चुका होतील. पण त्या चुकांममागे माझा उद्देश कधीच वाईट नसेल. मी एकटा देश बदलू शकत नाही. लाख प्रश्न असतील तर लाख उत्तरही सापडतील. कठोर परिश्रम,प्रामाणिकपणाशिवाय माझ्याकडे काहीच नाही. मला कुठलाही वारसा नाही,माझे वडील,आजोबा,आजी,आई अशा कुणाकडूनही मला काही मिळालं नाही. सामान्य माणसांमध्ये जे किमी जास्त असतं ते सगळं माझ्यात आहे अशी भावूक साधही मोदींनी घातली.
राहुल गांधींना टोला
जो काही काम करू शकतो असं लोकांना वाटतं त्यांच्याकडूनच लोक अपेक्षा ठेवतात. ज्यांच्याकडून अपेक्षा नाही त्यांना लोक काय सांगणार ?, ज्यांना वाटतं काहीच बदल घडू शकत नाही. काहीच होणार नाही तेच लोक निराशा पसरवतात. लोकांच्या अपेक्षा आणि आकांक्षा वाढत आहे. ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळचं राज्यकर्त्यांवर दबाव वाढतो असं म्हणत नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना टोला लगावला.
नोटबंदीचं समर्थन
नोटबंदी नंतर अर्जेटीनाच्या अध्यक्षांनी मला सांगितलं की मला वाटलं माझा मित्र गेला. 86 टक्के नोटा चलनाबाहेर गेल्यातरीही या देशातील लोकांमुळेच सर्व परिस्थिती ठिक झाली आहे असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.
मोदी भावूक झाले
मला माझ्यासाठी काहीच मिळवायचं नाही. मी तर जनतेचा सेवक आहे. माझ्या आयुष्याचा प्रवास खडतर आहे. रेल्वे प्लॅटफॉर्म ते रॉयल पॅलेस हा प्रवास खडतर आणि कसोटी पाहणारा तरीही आनंददायक होता. नियत आणि नीती चांगली असेल तर यश हमखास मिळते आणि नाही मिळालं तरी चुकांमधून शिकत नवं काम करायला प्रेरणा मिळते. दररोज काहीतरी नवीन करावं ही माझी तळमळ आहे. ही तळमळ ज्या दिवशी संपून जाईल त्या दिवशी माझ्या हातून काहीच होणार नाही. अर्धा ग्लास रिकामा आणि किंवा अर्धा ग्लास भरलेला आहे असं उत्तर माझं नसतं. अर्धा ग्लास भरलेला आहे आणि अर्ध्या ग्लासमध्ये हवा आहे हा माझा दृष्टीकोन आहे असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
लोकांच्या अपेक्षांच्या ओझ्यामुळेच काम करायला प्रेरणा मिळते. ज्यांना हे ओझं वाटतं ते लोक तरूण नाही असं समजा पण आता भारतात बदल होतोय, नवा भारत घडवण्यासाठी हा बदल आहे असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra modi, PM #ModiInUK