वॉशिंग्टन, 9 जानेवारी : अमेरिकन (US) संसद कॅपिटॉल हिलवर (Capitol Hill) ट्रम्प समर्थकांनी बुधवारी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर डेमॉक्रॅटीक पक्षानं (Democratic Party) ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमेरिकन प्रतिनिधी सभेच्या स्पिकर नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) यांनी ट्रम्प यांच्या जवळ असलेल्या न्यूक्लिअर कोडबद्दल (Nuclear Code) चिंता व्यक्त केली आहे. या विषयावर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या संसद सदस्यांना पत्र लिहिलं आहे.
काय आहे चिंता?
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी न्यूक्लिअर कोडबद्दल सेना प्रमुखांशी चर्चा केली आहे, असा दावा पेलोसी यांनी या पत्रात केला आहे. याच कोडच्या मदतीनं अण्वस्त्र हल्ला करण्याचा आदेश देण्याचा अधिकार अमेरिकेच्या अध्यक्षांना आहे.
पेलोसी यांनी सांगितलं की, “मी अमेरिकन सैन्याचे जॉईंट चीफ ऑफ स्टाफ चेअरमन मार्क यांची भेट घेतली. एक अस्थिर अध्यक्ष न्यूक्लिअर कोडपर्यंत पोहचण्याच्या आधी काय सावधगिरी बाळगावी? यावर त्यांच्याशी चर्चा केली. अस्थिर राष्ट्रपतीमुळे या प्रकारची भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते,’’ असा त्यांनी दावा केला.
‘अमेरिका वाचवण्यासाठी सर्व करणार’
“आमचा देश, देशातील लोकं आणि लोकशाही वाचवण्यासाठी आणि त्यावरील कोणत्याही हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी आम्हाला जे शक्य आहे, ते सर्व करु’’, असं पेलोसी यांनी स्पष्ट केलं. डोनाल्ड ट्रम्प यांना पदावरुन दूर करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
ट्रम्प यांना दणका!
ट्रम्प समर्थकांनी बुधवारी केलेल्या हिंसाचराची शिक्षा ट्रम्प यांनाही मिळू लागली आहे. हिंसेनंतर ट्विटरने ट्रम्प यांचं अकाऊंट 12 तासांसाठी ब्लॉक केलं होतं. त्याशिवाय त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन अनेक ट्विट्सही हटवण्यात आले होते. परंतु आता ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी बंद केलं आहे.
ट्विटरसह डोनाल्ड ट्रम्प यांचं फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटही बंद करण्यात आलं आहे. नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन यांच्या शपथविधीपर्यंत, डोनाल्ड ट्रम्प फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा वापर करू शकणार नाहीत. बायडन 20 जानेवारी रोजी अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Donald Trump