मुंबई, 4 ऑगस्ट : कोरोनाचा धोका टळला असला तरी सध्या मंकीपॉक्सची (Monkeypox) धास्ती मोठ्या प्रमाणात आहे. विविध ठिकाणी या आजाराचा धोका वाढत आहे. परंतू, विमान प्रवास करणाऱ्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही. तुमचा सहप्रवासी मंकीपॉक्सने बाधित असला तरी यापासून बचाव करता येऊ शकतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीला स्पर्श होत नसेल आणि प्रवासादरम्यान मास्क घातलेला असल्यास संसर्ग टाळता येणं शक्य आहे.
एक 22 वर्षीय तरुण विमान प्रवास करून नुकताच संयुक्त अरब अमिरातीहून (यूएई) केरळला (Kerala) पोहोचला. त्याने 5 दिवसांपर्यंत आरोग्य केंद्रात याची माहिती दिली नाही. एन्सेफलायटिसमुळे (Encephalitis) मेंदूत सूज येऊन त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरात मंकीपॉक्सची दहशत पसरली. संसर्ग झालेला असताना युवकाला विमान प्रवास कसा काय करू दिला गेला? असा सवाल केंद्र सरकारने तत्काळ यूएईतील अधिकाऱ्यांना विचारला आहे. त्यानंतर विमान प्रवास किती सुरक्षित आहे यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
काय काळजी घेणार?
तज्ज्ञांच्या मतानुसार, मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीची त्वचा, तोंड किंवा त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवले असतील तर याचा धोका जास्त असतो. एखादी जखम झालेली असेल आणि त्यातील द्रवपदार्थाच्या थेट संपर्कात आल्याने मंकीपॉक्स होण्याची शक्यता असते. दूषित लिनेनच्या अप्रत्यक्ष संपर्कात आल्याने याचा प्रसार होऊ शकतो. याशिवाय शिंकेतून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबाद्वारेही संसर्गाचा धोका अधिक असतो.
संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या अधिक काळ संपर्कात राहिल्यास या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असते. परंतु, कोरोनाचे नियम पाळून म्हणजे मास्क घालून, अंतर राखून तुम्ही वावरला असाल तर तर मंकीपॉक्सपासून तुमचं संरक्षण होईल.
पुरूषांना सर्वाधिक धोका
तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरूषांमध्येच संसर्गाचा अधिक धोका आहे. पुरुषांवर केंद्रीत असलेल्या प्रकरणांवर विशेष लक्ष असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organisation) लैंगिक संबंधांतून प्रसार होणाऱ्या आजारांचे तज्ज्ञ सल्लागार अँडी सीले यांनी म्हटलं आहे. महिला आणि मुलांची खूप कमी प्रकरणं समोर आली आहेत. पण पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणं अधिक आढळून आल्याचेही त्यांनी सांगितलं.
पगार हजारोंमध्ये अन् संपत्ती करोडोंची; अलिशान इमारत, लाखोंची रोकड, गाड्या.., क्लर्कची संपत्ती पाहून अधिकारीही थक्क
डॉक्टरांचा सल्ला घ्या
मंकीपॉक्सचा धोका वाढत असताना सतर्क असणं कधीही चांगलं. त्यामुळे आपण स्वत: किंवा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीच्या शरीरावर पुरळ, कांजिण्या आलेल्या असतील, ताप, डोकेदुखी, शारीरिक वेदना, सुजलेल्या नसा, खूप अशक्तपणा अशी काही तक्रार असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. मागील 21 दिवसांत आपण परदेश प्रवास करून आला असाल तरीही काळजी घ्यायला हवी.
दरम्यान, मंकीपॉक्समध्ये 1 टक्क्यांपेक्षाही कमी मृत्यूचा धोका आहे. या आजाराला घाबरण्याची गरज नाही. गृह विलगीकरणात (होम आयसोलेशन) राहून या संसर्गापासून दूर राहता येतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.