Home /News /videsh /

Miss International Trans 2021 - भारताचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या ट्रान्स मॉडेल आर्चीची संघर्षगाथा

Miss International Trans 2021 - भारताचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या ट्रान्स मॉडेल आर्चीची संघर्षगाथा

मिस इंडिया ट्रान्सचा किताब जिंकणारी आर्ची सिंग  (Archie Singh) हिनं मॉडेलिंगच्या क्षेत्रात मोठं नाव कमावलं आहे.

    नवी दिल्ली, 05 जानेवारी : आर्ची सिंग (Archie Singh) ही 22 वर्षांची ट्रान्सजेंडर (Transgender Women) युवती यंदा कोलंबियात (Colambia) होणाऱ्या मिस इंटरनॅशनल ट्रान्स 2021 (Miss International Trans ) स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. दिल्लीत राहणारी आर्ची सिंग ही ट्रान्सवुमन असून, तिनं लिंगबदल शस्त्रक्रिया करून स्त्रीरूप धारण केलं आहे. वयाच्या सतराव्या वर्षी आर्ची सिंग पहिल्यांदा आपल्या स्त्री रुपात जगासमोर आली. मिस इंडिया ट्रान्सचा किताब जिंकणाऱ्या आर्ची सिंग हिनं मॉडेलिंगच्या क्षेत्रातही मोठं नाव कमावलं आहे; पण त्यासाठी तिला मोठा संघर्ष करावा लागला आहे. आर्ची सिंग हिच्या संघर्षाचा प्रवास सुरू झाला तो तिच्या शालेय जीवनापासून. दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढणाऱ्या आर्चीला शाळेत असतानाच आपल्या वेगळेपणाची जाणीव झाली होती. आपण मुलगी असल्याची तिची ठाम धारणा होती. तिच्या या प्रवासात तिला तिच्या घरच्यांनी खंबीर पाठिंबा दिला. तिनं जेव्हा स्त्री रुपातच जगासमोर येण्याचं ठरवलं तेव्हा तिचं सगळं कुटुंब तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं. तिला तिचं मूळ रूप प्रत्यक्षात जगायचं होतं. खरी ओळख लपवून आभासी आयुष्य जगायचं नव्हतं. त्यामुळं वयाच्या सतराव्या वर्षी तिनं आपली खरी ओळख जगासमोर आणण्याचा निर्णय घेतला. ती स्त्री वेशात जगासमोर आली. त्यानंतर तिनं मॉडेलिंगमध्ये आपली कारकीर्द घडविण्यास सुरुवात केली. "त्याआधी मी सामाजिक कार्य करत होते. ट्रान्स जेंडर म्हणजे नक्की काय, याबाबत जागरूकता निर्माण करणं, त्यांच्याबद्दलचे गैरसमज दूर करणं यासाठी प्रयत्न करत होते. मॉडेलिंगमुळे या कामाला मदतच झाली. अनेक संधी खुल्या झाल्या. त्यामुळं मॉडेलिंगबद्दलचं माझं प्रेम वाढतचं गेलं", असं आर्ची म्हणते. तिचं मॉडेलिंगच्या क्षेत्रातील काम सुरू झाल्यावर तिनं स्त्री रूपासाठी  आवशयक असलेल्या सर्व शस्त्रक्रिया करून घेतल्या. तिचा जणू पुनर्जन्मच झाला. एक नवी आर्ची उदयाला आली आणि तिनं आपल्या आकांक्षांची क्षितीजं काबीज करायला सुरुवात केली. 'गृहिणींच्या कामाची किंमत पैशात होऊच शकत नाही पण..' शशी थरुर यांचं कंगनाला उत्तर आर्चीनं मिस ट्रान्स इंडिया स्पर्धा जिंकली. ती एका नामवंत ब्रँडची  ब्रँड एम्बेसेडर बनली. अनेक फॅशन शोजमध्ये शो स्टॉपर म्हणून तिला बोलावलं जाऊ लागलं तरीही कुठेतरी समाजाची संकुचित मानसिकता दिसत होतीच. अनेकदा तिची संधी नाकारली गेली ती तिच्या दिसण्यामुळं किंवा कौशल्यातील कमतरतेमुळं नाही तर केवळ ती ट्रान्सवुमन असल्यानं. सुरुवातीच्या काळात मॉडेलिंगच्या क्षेत्रात कामासाठी संघर्ष करताना आलेला एक विदारक अनुभव आर्ची सिंगनं सांगितला. ती एकेठिकाणी कामानिमित्त भेटायला गेली होती, त्यावेळी काम देणाऱ्या व्यक्तीनं तिला सांगितलं की, तू खरी स्त्री नाहीस. त्यांना महिला मॉडेल हवी होती पण त्यांना ट्रान्स वुमन नको होती, मात्र तसं स्पष्टपणे सांगायला ते तयार नव्हते. आर्ची सिंग हिनं त्यांना सांगितलं की, ती महिलाच आहे. ट्रान्स असली तरी इतर सामान्य महिलांसारखीच आहे. तिच्या अधिकृत सरकारी ओळखपत्रावरदेखील ती महिला असल्याचा उल्लेख आहे.  तरीही त्या लोकांनी तिला ते काम दिलं नाही. आजच्या आधुनिक काळातही आपल्या समाजात ट्रान्सजेंडर लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोन किती दूषित, संकुचित आहे, हेच यातून अधोरेखित होतं. आज तिच आर्ची सिंग आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. आता या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळं आपल्या देशातील लोकांच्या मनातील ट्रान्सजेंडर लोकांविषयी असलेले गैरसमज दूर होण्यास मदत होईल, असा विश्वास आर्चीला वाटतो.

    वयाच्या ऐंशीतही रतन टाटा यांच्यातील माणुसकीचं पुन्हा एकदा दर्शन; पुण्यात घडली भावनिक भेट

    आजही आपल्या समाजात ट्रान्सजेंडर व्यक्तींना सर्वसामान्य माणसासारखी वागणूक दिली जात नाही, त्यांची खिल्ली उडवली जाते. त्यांना नोकरी, व्यवसायात संधी मिळत नाही. त्यांना आपला समूह निर्माण करून लग्नात कार्यक्रम सादर करावे लागतात किंवा सिग्नलवर भीक मागावी लागते. कोणत्याही व्यक्तीची संधी लिंगभेदामुळं नाकारली जाता कामा नये. माणूस ही तिची पहिली ओळख समजली पाहिजे, असं आर्चीचं म्हणणं आहे. भारतीयांमध्ये याबाबत जागरुकता खूप कमी आहे. आजच्या काळात याबाबतीत गैरसमज असणं चुकीचं आहे. मी लोकांच्या गैरसमजुती दूर करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधायला तयार आहे. मला लोकांना या विषयावर शिक्षित करायचं आहे, असंही आर्चीनं सांगितलं. या स्पर्धेत यश मिळो किंवा न मिळो पण आर्ची तिला मिळालेल्या या संधीचा उपयोग लोकांची मानसिकता बदलण्यासाठी करणार आहे. लोकांनी माझी दखल भारताची प्रतिनिधी म्हणून घ्यावी, या समाजाची प्रतिनिधी म्हणून नाही, अशी तिची अपेक्षा आहे.
    First published:

    पुढील बातम्या