कॅलिफोर्निया, 14 ऑक्टोबर : एका महिलेला आपल्या घरात सापांची अख्खी फौज (Many snakes found inside home) आढळल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. आपल्या घरात साप शिरणं, ही अनेकांसाठी भीतीदायक गोष्ट असते. अनेकांना सापाच्या कल्पनेनंही घाम फुटतो. विषारी साप आपल्याला चावेल आणि आपला जीव जाईल, अशी भीतीही अनेकांना वाटत असते. अशा परिस्थितीत सापांची (Rescue operation of snakes in US) अख्खी फौजच घरात सापडली, तर काय अवस्था होईल, याची कल्पना करा. अशीच परिस्थिती एका महिलेवर ओढवली आणि तिची भितीने अक्षरशः गाळण उडाली.
महिलेला दिसला साप
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील सोनोमा काऊंटी भागात राहणारी महिला जेव्हा बाहेरून घरात आली, तेव्हा तिला एक साप दिसला. अमेरिकेतील साप पकडून नेणाऱ्या रेस्क्यु टीमला फोन करून तिने याची कल्पना दिली. काही वेळात रेस्क्यु टीम तिथे दाखल झाली. नेहमीप्रमाणे एखादा साप घरात घुसला असेल आणि तो पकडून काही मिनिटांत आपण तिथून निघून जाऊ, अशी रेस्क्यु टीमची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात जेव्हा या टीमनं महिलेच्या घरात प्रवेश केला, तेव्हा त्यांचीदेखील गाळण उडाली.
घरात दिसलं हे चित्र
या टीमला घरात आल्यानंतर एक साप नव्हे, तर सापांचं अख्खं कुटुंबच तिथं राहत असल्याचं दिसलं. या टीमचे डायरेक्टर एलन वुल्फ यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट केली आणि घटनेची माहिती दिली. गेल्या आठवड्यात आपल्याला एका कॉल आला. घरात साप शिरल्याचं समजलं. तिथं पोहोचल्यावर आम्हाला एक नव्हे तर 22 मोठे साप दिसले. त्यांच्या जोडीला 59 छोटे साप होते. एवढ्या संख्येनं एकाच जागी साप आढळल्याची ही दुर्मिळ घटना आहे. या ऑपरेशनसाठी आपल्याला 3 तास आणि 45 मिनिटं लागली, असा अनुभव त्यांनी शेअर केला आहे. एका खेपेत एवढे साप नेणं शक्य नसल्यामुळे आपल्याला महिलेच्या घरी दोनदा फेरी मारावी लागली, असंही त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.