बर्मिंगहॅम, 27 ऑक्टोबर: लहान मुलं अतिशय निरागस असतात. ती आपल्या सहज सुलभ बाललीलांच्या माध्यमातून कुणालाही आपल्याकडे आकर्षित करून घेतात. अशा निरागस बाळांना पाहून कितीही कठोर मनाची व्यक्ती असली तरीही आनंदी होते. मात्र, काही व्यक्ती याला अपवाद असतात. जन्मदात्या आई-वडिलांनी किंवा नातेवाईकांनी नवजात बालकांची हत्या केल्याच्या अनेक घटना आपल्या कानांवर येत असतात. अशीच एक घटना ब्रिटनमध्ये समोर आली आहे. बर्मिंगहॅममध्ये राहणाऱ्या एका पाषाणहृदयी व्यक्तीनं तीन आठवड्यांच्या मुलीला जीवे मारण्याचा (Man Tried kill 3 year old Girl) प्रयत्न केला. मात्र, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी काहीना काही पुरावा मागे सोडतोचं. या व्यक्तीनं देखील गुगलवर एक पुरावा मागे सोडला आणि त्याच पुराव्याच्या आधारे तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
'डेली मेल'नं दिलेल्या वृत्तानुसार, 21 वर्षीय जमार बेली (Jamar Bailey) नावाच्या व्यक्तीनं जाणीवपूर्वक एका नवजात बाळाला इजा पोहोचवल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली होती. त्यानं बाळाला घातक औषधे पाजल्याचा त्याच्यावर आरोप होता. जून 2021मध्ये ब्रिटनमधील बर्मिंगहॅममध्ये (Birmingham Crime Case) हे प्रकरणं घडलं होतं. पीडित बाळाला अत्यावस्थ स्थितीमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याची अवस्था पाहता डॉक्टरांनी त्याला आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करून घेतलं.
वाचा-अवघ्या 24 व्या वर्षी झाली 21 मुलांची आई, असा करते मुलांचा सांभाळ; पाहा PHOTOs
त्यानंतर बाळाच्या लघवीची तपासणी केली असता त्याच्या शरीरात सोडियम व्हॅल्पोरेट (Sodium Valporate) नावाच्या औषधाचे अंश आढळले. हे औषध अपस्मार म्हणजे ज्या व्यक्तींना वारंवार चक्कर येते अशांच्या उपचारासाठी वापरले जाते. हे औषध लहान मुलासाठी घातक आहे. तीन आठवड्यांचं बाळ अनावधानाने हे औषध पिऊ शकत नाही, याची डॉक्टरांना खात्री होती. हे प्रकरण संशयास्पद वाटल्यानं त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर त्यांना बाळाच्या दूधाच्या बाटलीमध्ये सोडियम व्हॅल्पोरेट सापडलं. त्यानंतर त्यांनी जमार बेली नावाच्या व्यक्तीला संशयावरून अटक केली होती.
वाचा-बाबर आझमची GF असल्याचा तरुणीचा दावा,'कुराण'वर हात ठेवत म्हणाली-त्याने 10 वर्ष...
प्रकरणाचा अधिक तपास केला असता, बेलीनं गुगलवर लहान बाळाची हत्या कशी करावी (How to kill baby), बाळाला विष कसं द्यावं, याबाबत माहिती शोधल्याचं समोर आलं. याशिवाय त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर सोडियम व्हॅल्पोरेटचा समावेश असलेल्या एपिलिम क्रोनो नावाच्या औषधाचं एक प्रिस्क्रिप्शन देखील सापडलं. यासर्व गोष्टींवरून बेलीनंच बाळाला औषध दिल्यचं स्पष्ट झालं. उलट तपासणीमध्ये बेलीनं आपला गुन्हा कबुल केला. त्यानंतर सोमवारी (25 ऑक्टोबर 2021) त्याला बर्मिंगहॅम क्राउन कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं त्याला 25 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शिवाय पॅरोल मिळवण्यासाठी एक अट देखील घातली आहे. पॅरोलसाठी अर्ज करण्यापूर्वी बेलीला एकूण शिक्षेच्या दोन तृतीयांश शिक्षा भोगावी लागणार आहे. त्यानंतरच त्याला पॅरोलसाठी अर्ज करता येईल.
दरम्यान, आयसीयूमध्ये दाखल केलेल्या बाळाची प्रकृती ठीक झाली असून ते सध्या एकदम ठणठणीत आहे. मात्र, हे बाळ कुणाचे आहे आणि त्याला आरोपी बेलीनं औषध का दिलं, याबाबत माहिती समोर आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news